नागपुर – नागपुरातील हिंदी मोर भवनच्या सभागृहात अ. भा. अन्यायग्रस्त आदिवासी समन्वय समिती आणि आदिम कर्मचारी संघटनेकडून आदिवासी हलबा,हलबी जमातीच्या मेळाव्यात प्रचंड उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतिबा ,बिरसा मुंडा यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. मेळावाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ समाजसेवक दे बा नांदकर तर प्रमुख अतिथी म्हणून आदिम नेत्या अड.नंदा पराते, अ. भा. अन्यायग्रस्त आदिवासी समन्वय समितीचे प्रकाश निमजे,आदिम संशोधन अध्ययन मंडळाचे विचारवंत व लेखक दया पराते, सुधाकर कोसराबे, शिवानंद सहारकर, शिवराम हेडाऊ, देवनाथ दलाल , मनोहर हेडाऊ, अभिजीत दलाल मंचावर उपस्थित होते .
“आरक्षण नाही म्हणून हलबा नाही ! विणकरी नाही म्हणून कोष्टी नाही ! आता पुढे काय?” या विषयावर चर्चा करतांना राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या आदिम नेत्या अड.नंदाताई पराते म्हणाल्या कि इतिहासकारांना विदर्भात स्वातंत्रपूर्व काळात लाखोंच्या संख्येने हलबा ,हलबी जमातीची लोकसंख्या दिसली, विदर्भातील ह्याच हलबा,हलबी जमातीने कोष्टी हा व्यवसाय केल्याचे सरकारी दप्तरात ऐतिहासिक पुरावे आहेत.याच कारणाने इतिहासकारांनी विदर्भात लाखोंच्या संख्येने असलेल्या कोष्टी धंद्यातील हलबा जमातीस बोगस ठरविले नाही. सन १९६० नंतर विदर्भ प्रांताचा महाराष्ट्रात समावेश झाल्यावर षडयंत्रातून महाराष्ट्रातील ४५ जमातींच्या आदिवासींची निधी हडपणे,आदिवासी योजनेत भ्रष्ट्राचार करणे व आरक्षणापासून वंचित ठेवणे या कारस्थानातून ३३ आदिवासी जमातीचे जाती दाखले अवैध ठरवून अन्याय केले जात आहे. आपल्या अस्तित्वासाठी लढत राहिलो पाहिजे. सरकार इतिहास मान्य करीत नाही तोपर्यंत अन्याय, अत्याचार विरोधात संघर्ष सुरु ठेवला पाहिजे.
आदिवासी हलबांची आरक्षणाची चळवळ – संदर्भ आणि इतिहास या पुस्तकाचे लेखक प्रकाश निमजे म्हणाले कि सन १८८१ व सन १८९१ मध्ये विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने हलबा,हलबी जमातीची लोकसंख्या होती ,त्यावेळी नागपुरात ४० हजार होते ,तेच व्यवसायाने कोष्टी म्हणून ओळखू लागले हा इतिहास सरकार मान्य करीत नाही आणि हलबांची मातृभाषा आम्ही आजही हलबी बोलत असल्याचे जिवंत पुरावा सरकार मान्य करीत नाही. तोपर्यंत हलबांनी ३३ अन्यायग्रस्त आदिवासी समाजासोबत राहून अस्तित्वाचा लढा सुरु ठेवला पाहिजे. आदिवासी हलबांची आरक्षणाची चळवळ – संदर्भ आणि इतिहास या पुस्तकाच्या माध्यमाने अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने हि पुस्तक वाचून आह्मी खरे हलबा आहोत ,याची जागृती समाजात करून कलंक पुसून काढावे.
जेष्ठ समाजसेवक दे बा नांदकर म्हणाले कि सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र बोगस अथवा खोटे कसे होऊ शकते ? सरकारकडून कर्मचाऱ्याचा छळ सुरु झाला त्यामुळे कर्मचाऱ्यात धास्ती आहे. समाजातील युवक व विद्यार्थी यांच्यावर सतत अन्याय होत असल्याने समाजात असंतोष आहे , हलबा आदिम जमातीचा संरक्षणासाठी एकजुटीने आह्मी लढा देत आहोत. हलबांना हलबा-कोष्टी करण्याचे षडयंत्र हे संविधान विरोधी आहे.
अभिजीत दलाल म्हणाले कि हलबा हे हिंदू धर्मियापेक्षा वेगळे आहेत .हलबांची वेगळी संस्कृती ,रीतिरिवाज ,परंपरा, देवदैवत आहेत परंतु हलबांनी पोटा-पाण्यासाठी कोष्टी हा व्यवसाय स्वीकारून हिंदू धर्मात येण्याचे पाप केले . या हिंदू धर्माच्या नावाखाली हलबांवर अन्याय होत आहे. या देशाचे संविधान सांगते कि धर्माच्या नावावर भेदभाव करता येणार नाही पण हलबांबाबत अशी घटना नेहमीच घडत आहे .
विचारवंत व लेखक दया पराते म्हणाले कि सन १८२७ पासूनचे पुरावे सरकारला देऊन विदर्भातील हलबा,हलबी ह्यांनीच कोष्टी व्यवसाय केला होता,हा सरकारी इतिहास सरकार मान्य करून कोष्टी अशी व्यवसायवाचक नोंदी आहे.पण सरकार कोष्टी हा हलबांचा व्यवसाय असल्याचा इतिहास मान्य करीत नाही.
शिवानंद सहारकर म्हणाले कि विदर्भातील हलबा जमात गरीब व अशिक्षित असल्याने कोर्टात जाऊन न्याय मिळवू शकत नाही यामुळे अन्याय करणे सुरुच आहे.कोष्टी व्यवसायमुळे स्थानिक रिवाजानुसार हलबा कोष्टी संबोधले तरी खरे हलबाच आहेत.
या मेळाव्यात “आरक्षण नाही म्हणून हलबा नाही ! विणकरी नाही म्हणून कोष्टी नाही ! आता पुढे काय?” या विषयावर आणि आदिवासी हलबांची आरक्षणाची चळवळ – संदर्भ आणि इतिहास या पुस्तकावर समाज विचारवंत सुधाकर कोसराबे, शिवानंद सहारकर, शिवराम हेडाऊ, देवनाथ दलाल , मनोहर हेडाऊ यांनी आपले विचार मांडले.
मेळावाचे संचालन प्रकाश दुलेवाले आणि भारती मांढळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नीलिमा भनारकर यांनी केले. हलबांची सभा यशस्वी करण्यासाठी धनंजय धापोडकर, जेष्ठ साहित्यिक ओमप्रकाश पाठराबे , नागोराव पराते, शंकर मौदेकर ,वासुदेव वाकोडीकर,कैलास निनावे, विठ्ठल बाकरे ,रघुनंदन पराते,देवेंद्र बोकडे ,हरी चिंचघरे ,धनराज कुंभारे,श्याम गोडबोले,गुलाब खापेकर,रवी हुंगे, डॉ.विजय सोरते ,राजू नंदनवार,दशरथ गहाणे तसेच आदिम संशोधन अध्ययन मंडळची टीम यांनी अथक परिश्रम घेतले.