लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल प्रकाशित ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध

        नागपूर, दि. 11 : राज्य लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल नुकताच राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर प्रकाशित करण्यात आला आहे. तो मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये असून त्यासोबतच नागरिकांकडून आयोगाकडे सातत्याने विचारणा करण्यात येणारे प्रश्नही मराठी व इंग्रजी भाषेत पोर्टलवर उपलब्ध आहेत.

आयोगाचा वार्षिक अहवाल हा सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी- कर्मचारी  अशा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे नागपूर विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांनी  एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा प्राप्त करण्याचा अधिकार असून या आयोगाच्या माध्यमातून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येते. ‘आपली सेवा, आमचे कर्तव्य’ असे ब्रिदवाक्य असलेल्या या आयोगाद्वारे प्रशासकीय कार्यपद्धतीविषयीच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते. त्यामुळे लोकसेवा देणाऱ्या यंत्रणांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे. आपले सरकार पोर्टलवरील जलद सेवा, सेवा आपल्यादारात, सहज पोहोच, सोपी शुल्कभरणा, वापरण्यास सोपे आणि वेळेची बचत आदी विंडोंच्या माध्यमातून लोकसेवा हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांना मदत करण्यात येते.

राज्य लोकसेवा हक्क आयोगाचा प्रसिद्ध झालेला 2020-21 या वर्षाचा हा अहवाल सर्व नागरिकांना ‘आपले सरकार’ या पोर्टलवरुन विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे. तो 176 पानांचा असून, आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या पुढाकाराने तो तत्परतेने प्रकाशित झाला आहे. त्यात लोकसेवा हक्क कायदा, त्याच्या अंमलबजावणीची राज्यातील सद्यस्थिती आदींसह विविध अनुषंगिक बाबींबाबत सर्वंकष माहिती समाविष्ट आहे. नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून हा अहवाल सहज उपलब्ध झाला असून इच्छुकांना तो सहजरित्या  डाऊनलोड करता येणार आहे.

 या अहवालाव्यतिरिक्त लोकसेवा हक्काबाबत नागरिकांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्नही आपले सरकार या पोर्टलवर स्वतंत्ररित्या उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून नागरिकांद्वारे वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी मार्गदर्शिका उपलब्ध झाली आहे. नागरिकांनी सुलभ संदर्भासाठी हा वार्षिक अहवाल आणि प्रश्नांबाबतच्या मार्गदर्शिकेचे अवलोकन करावे, असे आवाहनही आयुक्त यावलकर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सुरक्षेच्या दृष्टीने पूर्व नागपुरात अग्निशमन केंद्र महत्वाची भूमिका बजावणार : महापौर दयाशंकर तिवारी 

Mon Jan 10 , 2022
-वाठोडा येथे अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन  नागपूर, ता. ९ : नागपूर शहराचे वाढते क्षेत्र आणि वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने शहरातील विविध भागात अग्निशमन सुविधा असणे गरजेचे आहे. या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका शहरातील विविध भागात अग्निशमन केंद्रांची संख्या वाढवत आहे. पूर्व नागपूर हे दाटीवाटीचे क्षेत्र आहे. या परिसरात आशिया खंडातील सर्वात मोठे लाकूड बाजार आहे, डम्पिंग यार्ड आहे तसेच फळ आणि भाज्यांचे बाजार यासोबतच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!