संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 5 :- असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडियाची मागणी असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (एपीटीआय) भारतातील सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्यांना, प्रा. विमुक्ता शर्मा यांच्यासोबत घडलेल्या भीषण आणि निषेधार्ह घटनेने अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्या एका विद्यार्थ्याने विमुक्ता शर्मा यांच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले.
फेब्रुवारी महिन्यात इंदौर (मध्य प्रदेश) येथे ही घटना झाली, यामुळे संपूर्ण शैक्षणिक समाज खवळला आहे.
फार्मसी क्षेत्रातील प्रख्यात विद्वान प्रोफेसर विमुक्ता शर्मा यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. प्रोफेसर शर्मा एका विक्षिप्त विद्यार्थ्याच्या जीवघेण्या हल्ल्याचा बळी ठरल्या आणि त्यांच्या जाण्याने प्रत्येकाच्या हृदयात एक खोल पोकळी निर्माण झाली आहे. प्रा. विमुक्ता शर्मा या अत्यंत प्रतिष्ठित आणि कर्तृत्ववान शिक्षणतज्ञ होत्या ज्यांनी आपले जीवन फार्मसी शिक्षणाच्या क्षेत्रात समर्पित केले. त्यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण शैक्षणिक समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
एपीटीआयचे पदाधिकारी स्थानिक तपास यंत्रणांच्या सतत संपर्कात असून सर्वांनी या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एपीटीआयने एजन्सींवर जलदगती न्यायालयात खटला चालवावा आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
या भयाण घटनेची माहिती मिळताच एपीटीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मिलिंद उमेकर यांनी प्रो. विमुक्ता शर्मा यांना दाखल करण्यात आलेल्या रूग्णालयात इंदौर येथे भेट दिली. शर्माजी यांच्या परीवारांसोबत चर्चा करून एपीटीआय कडून सर्व सहकार्य करण्याची हमी देत त्यांचे सांत्वन केले. लगेच इंदौर येथील पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन सदर घटनेबाबत अपराध्यावर कडक कार्यवाही करण्याचे निवेदन दिले. यावेळी त्यांच्या सोबत एपीटीआय चे मध्य विभागाचे उपाध्यक्ष दिपेन्द्र सिंग व टिम एपीटीआय मध्यप्रदेश चे अध्यक्ष डॉ निर्मल डोंगरे तसेच इंदौर येथील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक समुदाय हादरला असून एपीटीआय या कठीण काळात एकत्र येऊन एकमेकांना साथ देण्याचा निर्धार करत आहे. देशभरात प्रा. विमुक्ता शर्मा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा, निषेध मोहीम, कँडल मार्च काढून घटनेचे गांभीर्य समाजासमोर आणले आहे. यासोबतच एपीटीआयच्या पदाधिकारी व सर्व सदस्यांच्या बैठकीतून एकच आवाज निघतो की, प्रा. विमुक्ता शर्मा यांच्या हल्लेखोरांवर निर्णायक कारवाई करण्यात यावी. एपीटीआय पहिल्यांदाच डॉ मिलिंद उमेकर यांच्या युवा नेतृत्वात पुढाकार घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहे.
याबाबत एपीटीआय तर्फे मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री यांनासुद्धा निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये प्रथम आणि महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी न्यायिक प्रक्रिया जलद करून आरोप्यास कठोर शिक्षा व्हावी, असे घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपींना दयामाया दाखवता कामा नये, मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून स्थानिय अधिकारी आणि पोलीस विभाग इंदौर यांना निर्देश देणे, प्रक्रिया जलद होण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून न्याय द्यावा.
एपीटीआय ची मागणी आहे की, फार्मसी शिक्षणाचे नियमन करणारी सर्वोच्च संस्था, फार्मसी काॅन्सील आॅफ इंडिया यांनी सुरक्षेसंदर्भात तपासणीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करावी आणि सुरक्षेबाबत कॉलेज आणि कॉलेज परिसराची तपासणी करण्याची मागणीही करत आहे. महिला मंचाच्या माध्यमातून ही बाब राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत पोहोचवली जाणार असून त्याकडे लक्ष देण्याची विनंती करण्यात येणार आहे.
समाजात शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा प्रकारची प्रवृत्ती वाढली तर देशाची येणारी पिढी अव्यवस्थित होईल. अशी आमची आग्रही मागणी आहे की सरकारी यंत्रणा आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया सारख्या शिखर संस्थेने शिक्षकांच्या सुरक्षिततेबाबत मानक-मार्गदर्शक तत्वे तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.
या घटनेमुळे एपीटीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मिलिंद उमेकर यांनी आपल्या संवेदना मांडल्या की अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांमुळे एपीटीआय चे पदाधिकारी व सर्व सदस्य हळहळले आहेत, शिक्षकांना अशा घटनेला किंवा कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागू नये ही आमची एकजूट आणि निर्धार आहे. एपीटीआय फार्मसी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या सुरक्षेसंदर्भात “विमुक्ता मार्गदर्शक मार्गदर्शक तत्त्वे” प्रकाशित करेल अशा शब्दांत प्रा.शर्माजींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.