संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 9:-सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे मराठी राजभाषा दिवस संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. बी. बागडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.तर प्रमुख वक्ता म्हणून डॉ. अरुंधती वैद्य ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी.बागडे यांनी मराठी भाषा ही संवादाची भाषा व्हावी याच्यासाठी म्हणून आपण संवाद जो आहे तो मराठी भाषेमध्ये करायला पाहिजे मात्र विदर्भात जो संवाद होतो तो हिंदीमधून होतो याबद्दल खंतही व्यक्त केली. आपण मराठी भाषेचा आग्रह तमिळ, तेलगू, बंगाली भाषिका प्रमाणे करायला पाहिजे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
यानंतर मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.महेश जोगी यांनी डॉ. अरुंधती वैद्य यांचा परिचय करून दिला आणि त्यांना मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी माझी जबाबदारी या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केले.
डॉ.अरुंधती वैद्य यांनी सुरुवातीलाच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रज यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन आपली मराठी भाषा जर खऱ्या अर्थाने समृद्ध करावयाची असेल तर आपले शिक्षणाचे इंग्रजी माध्यम आहे त्याला आपण कॉन्व्हेंट म्हणतो त्यामध्ये आपल्या मुलांना शिकवणे बंद करावे आणि आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण कसे देता येईल याबद्दल प्रयत्न करावे असे आपले मत मांडले. मराठी भाषेला सव्वादोन हजार वर्षाची परंपरा असून मराठीमध्ये एकूण 52 बोली बोलल्या जातात असे त्यांनी या ठिकाणी सांगितले. शिवाय परस्पर संवादासाठी बोलीभाषांचा वापर केला पाहिजे पण लिखाणासाठी मात्र प्रमाणभाषेचा वापर विद्यार्थ्यांनी करायला हवा याबद्दलही त्यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. महेश जोगी यांनी केले. आभार प्रदर्शन हिंदी विभाग प्रमुख डॉ.विकास कामडी यांनी केले.तर कार्यक्रमाच्या तांत्रिक अडचणी सा.प्राध्यापक सुरज कोंबे यांनी पार पाडल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.