महिला दिनानिमित्त मनपातर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार
नागपूर, ता. ८ : महिलांमध्ये व्यवस्थापन आणि नेतृत्वाची मोठी ताकद आहे. त्यांच्यातील संयम हा सर्वात मोठा गुण आहे. मात्र त्याचा फायदा घेतला जात असले तर शांत बसू नका. कामाच्या ठिकाणी किंवा घरी, कुठल्याही ठिकाणी, शारीरिक, मानसिक, शाब्दिक असा कुठल्याही प्रकारचा छळ होत असल्यास सहन करू नका. आपल्या जवळच्या महिलांनाही तो सहन करू देउ नका, एकमेकींना सहकार्य करून अत्याचाराविरोधात आवाज उठवा, असा मौलिक सल्ला नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिला.
नागपूर महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाद्वारे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून निगम सचिव डॉ.रंजना लाडे, रंजना राम जोशी, तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा ॲड.स्मिता सिंगलकर, देवयानी दीनकर उमरेडकर, महिला तक्रार निवारण समितीच्या सचिव कल्पना मेश्राम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी स्मार्ट सिटीच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भुवनेश्वरी एस. व अन्य मान्यवरांच्या हस्ते शहरातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या महिलांना सन्मानित करण्यात आले. समाजसेविका मिनुश्री रावत, गायिका व लेखिका डॉ. स्वाती धर्माधिकारी, फ्लोअर आर्टिस्ट, एशिया बुक विक्रमात नोंद असलेल्या स्वाती खंडेलवाल गादेवार, दिव्यांग खेळाडू रोशनी रिंके, दिव्यांग पॉवरलिफ्टिंग खेळाडू प्रतिमा बोंडे यांच्यासह नवलाई शहर स्तर संस्थेच्या महिलांना उपस्थित मान्यवरांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि तुळशीरोप देउन सन्मानित केले.
पुढे बोलताना स्मार्ट सिटीच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भुवनेश्वरी एस. म्हणाल्या, आपले, कुटुंबाचे नाव खराब होईल या भितीने अनेक महिला केवळ अत्याचार सहन करीत असतात. त्याचाच फायदा घेत अत्याचार आणखी वाढतो. त्यामुळे खंबीर होउन त्याविरोधात आवाज उठविल्यास अत्याचार करणारा कोणतिही कृती करण्याबाबत विचार करेल. स्त्री आणि पुरूष हे दोन वेगवेगळे घटक नसून दोघेही माणूस आहेत आणि ते समान आहेत असे संस्कार स्वत:च्या घरापासून मुलांना द्या, पुढे ते समाजात प्रवाहित करा, तेव्हाच परिवर्तन येईल, असेही त्या म्हणाल्या. मनपातर्फे सन्मानित करण्यात आलेल्या महिलांचे अभिनंदन करीत त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरवोल्लेखही केला.
तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा ॲड. स्मिता सिंगलकर यांनी महिलांना विविध प्रकारे होणा-या अत्याचाराबाबत माहिती देत त्याबद्दलच्या कायद्यांबद्दल सजग केले.
कुठल्याही माध्यमातून, घरी, कामाच्या ठिकाणी वा कुठेही आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्यास तो अन्यायच आहे व त्यासाठी दाद मागायला तक्रार निवारण समितीपुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अत्याचार करणा-यापेक्षा अत्याचार सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे सहन न करता त्याविरोधात आवाज उठवा. सातत्याने अत्याचार सहन करीत राहिल्यास त्याचा महिलांच्या शारीरिक व मानसिक प्रकृतीवरही परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अत्याचाराविरोधात तक्रार निवारण समितीद्वारे अनेक महिलांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे समितीपुढे येताना मन खंबीर ठेवा, कुठल्याही दबाव, धमक्यांना न घाबरता तक्रार मागे घेउ नका, असाही सल्ला ॲड. स्मिता सिंगलकर यांनी दिला.
वर्षातील प्रत्येक दिवस प्रत्येक महिला अनेक आव्हांनाना सामोरे जात त्यातून मार्ग काढते. रोजच संघर्षांना थोपवून मार्गक्रमण करणा-या महिलांसाठी वर्षातील ३६५ दिवसही महिला दिनापेक्षा मोठे आहेत, असे रंजना राम जोशी म्हणाल्या. घरकाम करणा-या, कष्टकरी आपल्या आजुबाजूला दिसणा-या महिलांना आपण सहकार्य करून सक्षम करण्यासाठी त्यांना बळ दिल्यास महिला दिनाचे औचित्य सत्कार्यास लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून मनपातील महिला कर्मचा-यांना मिळालेल्या न्यायाची माहिती दिली. त्यांनी महिलांना समितीच्या माध्यमातून आपला आवाज मांडण्याचे मोठे शस्त्र उपलब्ध झाल्याचेही सांगितले.
प्रास्ताविक तक्रार निवारण समितीच्या सचिव कल्पना मेश्राम यांनी तर संचालन कविता खोब्रागडे यांनी केले. आभार नूतन मोरे यांनी मानले.