-जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे नागरिकांना आवाहन
भंडारा, दि. 21 : सर्दी, अंगदुखी, खोकला अशी कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावे. ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार वेगाने होत असून सहव्याधी असणाऱ्यांनी अजिबात वेळ न दवडता वैद्यकीय सल्ल्याने उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख हा वाढता आहे. 17 जानेवारी रोजी 49, 18 जानेवारी रोजी 225, 19 जानेवारी रोजी 248, 20 जानेवारी रोजी 329 व आज 409 बाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा नागपूर विभागातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत सगळ्यात कमी (12.4) आहे. पुढील दहा दिवस भंडारा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून या दहा दिवसांमध्ये बाधितांची संख्या अधिक वेगाने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
बरेचदा सौम्य लक्षणे असतांना वेळकाढूपणा किंवा हलगर्जी करून लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये. अधिक बिकट होण्यापेक्षा त्यांनी वेळेत उपचार करून घ्यावे, असे श्री. कदम म्हणाले. जिल्ह्यामध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. जिल्हा प्रशासनाचे अधिकतर मनुष्यबळ हे निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यरत होते. आता निवडणुका संपल्यामुळे जिल्ह्यातील सर्व उपलब्ध मनुष्यबळाचा उपयोग हा कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येते की, त्यांनी मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराचे पालन करावे.