भंडारा : लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर कार्यरत आहे. नुकतेच भंडारा जिल्ह्याने राज्यात लसीकरणात आघाडी घेतली मात्र शंभर टक्के लसीकरणासाठी प्रशासन कडक पाऊले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अद्याप एकही डोस न घेतलेल्या कामगार व कर्मचाऱ्यांना आस्थापनांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी औद्योगिक आस्थापनांना दिले. नुकतीच उद्योग मित्र समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीला उद्योग महाव्यवस्थापक एच. के. बदर व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मोठ्या औद्योगिक आस्थापनांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात यावेत, असे त्यांनी निर्देश दिले. 30 नोव्हेंबर पूर्वी शंभर टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून नुकतीच 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही लसीकरणाद्वारे संरक्षित झालेली आहे. युवा स्वास्थ्य अभियान तसेच हर घर दस्तक व अन्य मोहिमांव्दारे लसीकरणावर प्राधान्याने जोर देण्यात येत आहे.
30 नोव्हेंबर पूर्वी शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी यावेळी दिले. तसेच जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण 93 टक्के तर दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण 52 टक्के आहे. लस घेतल्याने कोविडचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो व योग्य उपचाराने बाधित व्यक्ती लवकर बरा होतो. लसीकरणामुळे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असते व मृत्यूचा धोका देखील नगण्य असतो. कोविड-19 वर मात करण्यासाठीचे लसीकरणच एकमेव शस्त्र असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्या आस्थापनांमध्ये 1 डिसेंबर नंतर या सूचनांचे पालन होणार नाही. त्या आस्थापनांना तपासणी पथकांव्दारे आकस्मिक भेटी देण्यात येतील. सूचनांचे पालन न करणाऱ्या औद्योगिक, व्यापारी, आस्थापना विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, असे सुद्धा त्यांनी सांगितले. या बैठकीला औद्योगिक प्रतिनिधींमध्ये सुनील रंभाड, सुनील देशमुख, हर्षवर्धन हरडे, संदीप मारोडकर, डॉ. मनोहर कांबळे, रितेश माने, अनुप ढोके यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते .