नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या म्युरलचे लोकार्पण
नागपूर, ता. २४ : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आणि त्यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेचे योगदान मोठे आहे. या सेनेने इंग्रजांमध्ये दहशत निर्माण केली होती. परंतु, दुर्दैवाने हा इतिहास पाठ्यपुस्तकातून मांडला गेला नाही. युवा पिढीसाठी प्रेरणादायी असलेला हा इतिहास प्रत्येकाने जाणून घ्यायला हवा, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी (ता. 23) नागपुरातील नेताजी चौकात नेताजींच्या म्युरलचे लोकार्पण महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर महापौर दयाशंकर तिवारी, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, नगरसेवक ऍड. संजय बालपांडे, नगरसेविका सरला नायक, खादी ग्रामोद्योग केंद्रीय समितीचे सदस्य जयप्रकाश गुप्ता, ब्रिजभूषण शुक्ला, विनायक डेहनकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांना उजाळा दिला. आझाद हिंद सेनेची स्थापना कशी झाली, त्यासाठी नेताजींनी काय केले, लोकांनी त्यांना कशी मदत केली यावर प्रकाश टाकला. नेताजींचे नागपूरशी असलेले नाते, हत्तीवरून केलेले संबोधन आणि या भेटीत उत्तम हिंदी शिकण्याचे नागपूरकरांना दिलेले वचन या आठवणींनाही महापौरांनी उजाळा दिला. ज्या चौकात म्युरल साकारण्यात आले, त्या चौकाचे नाव नेताजी चौक आहे. मात्र, सेवासदन चौक या नावाने तो ओळखला जातो. आता नेताजींचे म्युरल लावल्याने यापुढे हा चौक अधिकृतरित्या नेताजींच्या नावांर ओळखला जावा, या परिसरातील व्यापाऱ्यांनीही दुकानाच्या पाटयांवर आणि कागदपत्रांवर नेताजी चौक उल्लेख करावा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार विकास कुंभारे आणि माजी आमदार गिरीश व्यास यांनीही यावेळी नेताजींच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. तत्पूर्वी मान्यवरांनी नेताजींच्या सैनिकी पोशाखातील म्युरलचे लोकार्पण केले. कार्यक्रमाला अनुप गोमासे, अजय गोव्हर, उमेश वारजूकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते. कोरोना नियमावलीच्या अधीन राहून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.