-संशोधन क्षेत्रात नोबल पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न
नागपूर दि.24 : किशोर वयात संशोधन क्षेत्रात अभुतपूर्व कामगिरी करणाऱ्या श्रीनभ मौजेश अग्रवाल या किशोर वयीन नागपूरकराला आज 24 जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संशोधन क्षेत्रात देशाला नोबल पुरस्कार मिळवून देण्याचे त्याचे स्वप्न आहे.
केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत किशोरांना दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार दरवर्षी दिल्या जातो. यावर्षी कोरोना काळात एकाच वेळी सन 20-21 व 21-22 या दोन वर्षांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. श्रीनभला सन 2020-21 साठी हा पुरस्कार मिळाला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या मुलांना या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येते. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती स्मृती ईराणी यांच्या उपस्थितीत आज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातून या सोहळ्यामध्ये नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, श्रीनभचे वडील डॉ. मौजेश अग्रवाल, आई डॉ. सौ. टिनू अग्रवाल सहभागी होते. श्रीनभला हा पुरस्कार डिजीटली दिला गेला. डिजीटल प्रमाणपत्र , 1 लाख रोख रक्कम पुरस्कार विजेत्याच्या खात्यात जमा करण्यात आली. 21 राज्यातील 23 मुलांशी आज प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला. संशोधन, साहस, समाजसेवा, कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रातील अभिनव प्रयोगासाठी नाविन्यपूर्ण उपलब्धतेसाठी हा पुरस्कार दिला जातो.
श्रीनभने लहान वयातच वैज्ञानिक क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे. त्याने स्वत: दोन पुस्तके लिहिली असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये त्याचे अनेक लेख छापून आले आहेत. याशिवाय ‘ट्रीपल लॉक बोर होल प्रोटेक्शन लीड’ वर त्याचे पेटंटदेखील प्रकाशित झाले आहे. ‘आयआयटी कानपूरचे’ भौतिकशास्त्राशी संबंधित दोन अभ्यासक्रमदेखील त्याने पूर्ण केले आहेत. याशिवाय कमी वयात पुस्तक लिखाणासंदर्भात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये देखील त्याच्या नावाची नोंद आहे. श्रीनभ सध्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स बंगलोर येथे प्रथम वर्षात (बीएस/रिसर्च) शिक्षण घेत आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे त्याला आज पुरस्कार प्राप्तीनंतर भेटवस्तू देऊन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सन्मानित केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना श्रीनभने संशोधन क्षेत्रात नोबेल पुरस्कार देशाला मिळवून देण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले.