नागपूर : कोरोना संसर्गाच्या बचावासाठी नागपूर शहरामध्ये मनपाद्वारे लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी मनपाद्वारे सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरात लसीकरणासाठी १९.७३ लाख व्यक्ती पात्र असून या सर्वांनी लसीकरणाचा पहिला डोज घेतला आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागपूरकरांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. नागरिकांचे अभिनंदन करीत दुसरा डोज लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर शहरात कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाने १९.७३ लाख पहिल्या डोजचा टप्पा पार केला असून आतापर्यंत शहरात लसीकरणाचे पहिला व दुसरा असे एकूण ३२ लाख २३ हजार डोजेस पूर्ण झाले आहेत. नागपूर मनपाने लसीकरणासाठी नागरिकांनी येणाची वाट न बघता ‘हर घर दस्तक’ मोहिमे अंतर्गत स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांना लस दिली, या मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कोरोनाच्या नवीन व्हॅरिएंट ‘ओमायक्रोन’चा धोका लक्षात घेता नागरिकांना मोठ्या संख्येत दुसरा डोज घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, दोन्ही डोज घेणाऱ्या नागरिकांना कोरोना झाल्यास त्याचा धोका कमी असतो.
नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात १६० लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून १८ वर्षावरील वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. नागपुरात लसीकरणाच्या पहिला डोजसाठी १९.७३ लाख पात्र नागरिक असून यामधून सर्व नागरिकांना पहिला आणि १२.५० लाखांच्यावर नागरिकांना दुसरा डोज देण्यात आला आहे. शहरात पहिला आणि दुसरा डोज मिळून ३२.२३ लाख डोजेस पूर्ण झाले आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण करणे व सोबतच कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत राहण्याचे आवाहन केले आहे.
अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की, मनपा आरोग्य विभागानुसार १६ जानेवारीपासून नागपुरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, डॉक्टर, शासकीय कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, जोखिमेच्या आजाराने ग्रस्त नागरिकांना लस देण्यात आली. आता १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची व्यवस्था करणारी नागपूर पहिली मनपा असून दिव्यांग, भिक्षेकरू आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड सुद्धा नाही अशा नागरिकांनाही मनपातर्फे लस देण्यात आली.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागानुसार आता ‘हर घर दस्तक’ मोहिम सुरु करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे अशा प्रकारची मोहिम अगोदरच हातात घेण्यात आली होती. प्रत्येक भागात नागरिकांसाठी लसीकरणाची सोय करून देण्यात आली होती. तसेच विद्यापीठाच्या विविध विभागात, महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये सुद्धा लस देण्याची व्यवस्था करून युवांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आला होता. काही समाजामध्ये लस घेण्यासाठी भीती निर्माण झाली होती. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात झोनल अधिकारी डॉ अतिक खान आणि त्यांच्या चमूतर्फे ‘त्या’ समाजातील धर्मगुरू, उच्च शिक्षित व्यक्ती यांच्याशी संपर्क करून त्यांना विश्वासात घेण्यात आले आणि लसीकरण करण्यात आले. तसेच उद्यानात, मोठमोठ्या निवासी संकुलात सुद्धा लसीकरणाची मोहिम राबिवण्यात आली. ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन, मनोरुग्ण, बेघर, तृतीयपंथी यांचे सुद्धा लसीकरण करण्यात आले.
याप्रकारे शहरातील १००% पात्र नागरिकांना आता दुसरा डोज देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. नागरिकांनी सुद्धा या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याचेच फलित आज लसीकरणाचा पहिला टप्पा १९.७३ लाखांच्यावर गेला आहे.
आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, सध्या १६८ केंद्रांवरून लसीकरण करण्यात येत आहे. पुढच्या दोन महिन्यानंतर मनपा प्रशासन शाळा, समाज भवन, मंदिर आणि अन्य ठिकाणी चालणारे सॅटेलाईट केंद्र बंद करणार आहे. कोव्हिडच्या संसर्गापासून बचावासाठी नियमांचे पालन आणि लसीकरण हेच सर्वात मोठे अस्त्र आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांकडे लक्ष न देता पात्र नागरिकांनी आपले लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.