नागपूर,दि.14 : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी मॅगनीज ओर इंडिया लिमिटेड (मॉईल) व जिल्हा प्रशासनात १३ जानेवारी रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार मॉईल कंपनी जिल्हा प्रशासनास दोन ऑक्सिजन संयंत्राच्या निर्मिंतीकरिता ३.५ कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे.
मॉईलतर्फे मनुष्यबळ व्यवस्थापन संचालक श्रीमती उषासिंग यांनी श्रीमती आर. विमला, जिल्हाधिकारी नागपूर यांना या संदर्भातील धनादेश दिला आहे. जिल्हा प्रशासनासोबत हा करार केला आहे. प्रस्तावित दोन ऑक्सिजन संयंत्रांपैकी एक सावनेर व एक उमरेड तालुक्यात बांधण्यात येईल. या संयंत्रांकरिता दोन्ही तालुक्यांत जागा सुद्धा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सावनेर येथील संयंत्र मौजा पिपळा येथे अर्धा हेक्टर जागेत तर उमरेड येथील संयंत्र उमरेड येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेत १७१२ वर्ग मीटर इतक्या भूखंडात निर्माण करण्यात येईल. करार झाल्यानंतर सात दिवसांमध्येच हा निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त होईल.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्व-संज्ञान जनहित याचिका क्र. ४/२०२० बाबत निर्गमित केलेल्या आदेशांना अनुसरून जिल्हा प्रशासनाने सावनेर व उमरेड येथे नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीकरिता मॉईल कंपनीस आवाहन केले होते. मॉईलने आपल्या सीएसआर निधीचा वापर करून या प्रकल्पाकरिता ३.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. निधी वितरण व निर्माण कार्यास चालू वित्तीय वर्षातच सुरुवात होईल असे करारात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे हा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.