नागपूर : नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आज बुधवारी विद्यार्थीनींच्या आरोग्य जागृतीच्या हेतूने मनपाच्या सर्व शाळेतील वर्ग ७ ते १२ च्या विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी पॅड वितरण उद्घाटन कार्यक्रम पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळा, गांधीबाग, नागपूर येथे शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शाळेतील ५१ विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी पॅड वितरण करण्यात आले. मा. शिक्षणाधिकारी महोदया यांनी विद्यार्थीनींना सॅनिटरी पॅड चे महत्व व वापराबाबत मार्गदर्शन व आवाहन केले.
कार्यक्रमाला माता – पालक समितीच्या अध्यक्षा तसेच इतर सदस्य उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मोहन करणकर, शिक्षण विभागाचे समन्वयक भारत गोसावी व प्रियंका गावंडे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
किशोरवयीन शाळकरी मुलीं मासिक पाळीच्या दरम्यान शाळेत गैरहजर असतात, अशी बाब पुढे आल्याने, राज्यात शालेयस्तरावर मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. केंद्राच्या ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ या उपक्रमांतर्गत राज्यातील उच्च प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे मनपा शाळांमधील विद्यार्थींनींना मासिक पाळीबाबत मार्गदर्शन आणि सॅनटरी पॅड वितरण करण्यात आले. मासिक पाळीची सुरुवात सर्वसाधारणपणे बाराव्या किंवा तेराव्या वर्षी होते. मासिक पाळीदरम्यान कापड किंवा इतर वस्तू वापरणे स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे, मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरावे, यामुळे संसर्ग रोखता येतो अशी माहिती विद्यार्थींना कार्यक्रमादरम्यान देण्यात आली. मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या खराब कपड्यांमुळे महिलांना योनीमार्गाचे संक्रमण, मूत्राशयाचा किंवा गर्भाशयाचा संसर्ग होतो. विशेष म्हणजे यामुळे महिलांच्या गर्भधारणेत अनेक अडचणी येतात. त्यामुळे, मुलींनी सुरूवातीपासूनच सॅनटरी नॅपकीनचा वापर करावा असे आवाहन मनपातर्फे आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थींना करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी पोहरे यांनी केले.
वर्षभरात सव्वा दोन लाख सॅनटरी पॅडचे वितरण
प्रस्तुत उपक्रमांतर्गत महानगरपालिकेतील प्रौगांडवस्थेतील विद्यार्थीनींच्या आरोग्याच्या दृष्टीने इयत्ता ७ वी ते १२ वी मधील एकूण ३५७४ विद्यार्थीनींना प्रति विद्यार्थीनी वार्षिक ६० सॅनटरी पॅड प्रमाणे २, १४, ४४० सॅनटरी पॅड चे वितरण करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात प्रति विद्यार्थीनी ३० सॅनटरी पॅड देण्यात येणार आहेत. यानंतर ३ ते ४ महिन्यानंतर दुसऱ्या टप्पयात उर्वरित ३० सॅनटरी पॅड देण्यात येतील.