‘सुपर-७५’ वर्गाला महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली भेट

नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतील मनपा शाळेतील ‘सुपर-७५’ विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. फुले मार्केट येथील नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेत सुरू असलेल्या ‘सुपर-७५’ वर्गांना महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी (ता. ११) भेट दिली. भेटीदरम्यान महापौरांनी विद्यार्थ्यांशी तसेच त्यांच्या पालकांशी चर्चा केली.
 
यावेळी मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकर, असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटचे सचिव जयंत गणवीर, मनीष वाजपेयी, नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका साधना सयाम तसेच पालक उपस्थित होते. 
 
महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की, नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी ते पुढे जाऊ शकत नाही. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आपले विद्यार्थी अंतरीक्षातही झेप घेण्याची जिद्द ठेवतात हे यापूर्वीही दाखवून दिले आहे. या अशा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना भविष्यात केवळ परिस्थितीमुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्यात अडथळे येऊ नयेत यासाठी नागपूर महानगरपालिकेने ‘सुपर-७५’चा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात मनपाच्या शाळेतील ७५ विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रासह देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज होतील. पुढेही हा उपक्रम सुरूच राहणार असून मनपाचे विद्यार्थी आपले नाव लौकिक करतील, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला.
 
पुढे ते म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांसाठी नेताजी मार्केट हिंदी शाळा दूर आहे आशा विद्यार्थ्यांना आणण्यासाठी व्यवस्था करावी आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांचेही समुपदेशन करण्यासाठी एक वर्ग घेण्यात यावा, अशी सूचना मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रिकोटकर यांना यावेळी केली. यामुळे पालक आपल्या घरी मुलांचा अभ्यास बद्दल माहिती घेऊ शकतील, त्यांच्या मनातील शंका दूर होऊन पाल्यांना ते उचित मार्गदर्शन करू शकतील, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटचे आभार मानले. 
 
‘सुपर-७५’ मध्ये मनपाच्या विविध शाळेतील निवडक ३५ मुली आणि ४० मुलांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शन करण्यात येत आहे. हे वर्ग प्रत्येक शनिवार आणि रविवारी घेतल्या जातात.
 
असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटचे सचिव जयंत गणवीर म्हणाले, महापौरांनी ‘सुपर-७५’ची आपली संकल्पना विषद केली आणि असोसिएशनद्वारे महापौरांच्या सूचनेला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेउन ७५ जणांची निवड करण्यात आली. नागपूर शहरात असोसिएशनच्या माध्यमातून सुमारे १००च्या वर कोचिंग क्लासेस आणि दोन हजार शिक्षक जुळलेले आहेत. या सर्वांच्या सहार्याने या ‘सुपर-७५’ विद्यार्थ्यांना त्याच दर्जेदार शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण देण्यात येणार आहे. मनपाच्या माध्यमातून असोसिएशनला ही संधी मिळाली असून असोसिएशनद्वारे आयआयटी,आणि नीट  परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना संपूर्ण सक्षम बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही जयंत गणवीर यांनी यावेळी दिली.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

घरातील कचऱ्यापासून जैविक खत निर्मिती करणाऱ्यांचा मनपातर्फे सन्मान

Sun Dec 12 , 2021
-स्वनिर्मित खतातून केले किचन गार्डन विकसित : मनपातर्फे घरी जैविक/गांडूळ खत निर्मितीस प्रोत्साहन   नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे कचऱ्यापासून जैविक/गांडूळखत निर्मिती करून किचन गार्डन विकसित करण्यावर भर दिला जात आहे. शनिवारी धंतोली झोन अंतर्गत अरविंद सोसायटी, नरेंद्र नगर येथील रहिवासी श्री अजित कुलकर्णी आणि सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री जाधव यांनी ओल्या कचऱ्यापासून जैविक/गांडूळखत निर्मिती करून किचन गार्डन विकसित केले आहे. धंतोली झोनच्यावतीने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!