-नितीन गडकरींची दूरदृष्टी, मोदींनीही घेतली दखल
नागपूर – युवकांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये खासदार क्रीडा महोत्सवांचे आयोजन केले पाहिजे असे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी संसदेत सर्व खासदारांना संबोधित करताना काही दिवसांपूर्वी सांगितले. पण नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याआधीची अशा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करून आपल्या दूरदृष्टीचा परिचय दिला आहे, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
नागपूरच नव्हे तर विदर्भ, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा खासदार सांस्कृतिक महोत्सव तब्बल दोन वर्षांनंतर यंदा 17 ते 26 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंड येथे होणा-या या नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार सांस्कृतिक सांस्कृतिक महोत्सव स्थळाचे भूमिपूजन व कार्यालयाचे उदघाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. कार्यक्रमाला माजी खासदार अजय संचेती, आ. प्रवीण दटके, आ. मोहन मते, आ. विकास कुंभारे व आ. कृष्णाभाऊ खोपडे यांच्यासह खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष अशोक मानकर, गौरीशंकर पाराशर, बाळासाहेब कुळकर्णी, रेणुका देशकर, संजय गुळकरी, आशिष वांदिले, चेतन कायरकर व आयोजन समितीचे इतर सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
केवळ रस्ते, पथदिवे किंवा इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे म्हणजे विकास नसून नागरिकांचा शारीरिक, मानसिक, बौद्धीक, सांस्कृतिक विकास व्हावा या उद्देशाने नितीन गडकरी यांनी पाच वर्षांपूर्वी सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवांचे आयोजन करायला सुरुवात केली होती. नागपुरातील कलाकारांना मोठा मंच मिळावा, हजारो लोकांच्यासमोर त्यांना आपली कला सादर करता यावी, या प्रतिभांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचावा, हा त्यामागचा उद्देश होता आणि तो सफल झाला आहे. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे मधले दोन वर्ष कोणत्याच घडामोडी होऊ शकल्या नाही, असे सांगताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, कोविडच्या संपूर्ण नियमांचे पालन करून परत एकदा खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या स्तुत्य उपक्रमाचे भूमिपूजन करताना आज आनंद होत असून हे आयोजन यशस्वीरित्या संपन्न व्हावे, यासाठी त्यांनी आयोजन समितीला शुभेच्छा दिल्या.
आ. मोहन मते यांनी नितीन गडकरींच्या माधम्यातून शहराला एक चांगली सांस्कृतिक मेजवानी मिळत असल्याचे सांगितले तर माजी खा. अजय संचेती यांनी नितीन गडकरींच्या कल्पनाशक्तीचे कौतूक केले. सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार व क्रीडापटू नागपुरात येत असल्यामुळे ही नागपूरकरांसाठी मेजवानीच असते, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. 2019 नंतर शहरात कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे शहरात एकही कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे कलाकारांचे या काळात खूप हाल झाले. त्यांच्या जीवनात भली मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढण्यासाठी लॉकडाऊनची नियम शिथील झाल्यानंतर लगेच खासदार एकांकिका स्पर्धांचे आयोजन करून कलाविश्वात नवचैत्यन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवडणुकांमुळे सध्या आचारसंहिता सुरू असून ती संपल्यानंतर लगेच खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन होणार आहे, असे प्रा. अनिल सोले म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश गुप्ता यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राजेश बागडी यांनी केले.
कोविड नियमांचे होणार पालन
खासदार सांस्कृतिक महोत्सवात दरवर्षी होणारी गर्दी बघता यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यासंदर्भात घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालक केले जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीची त्यासाठी मदत घेतली जात असून आयोजनस्थळी दररोज 8 ते 10 हजार मास्क वितरीत केले जाणार आहे. दोन खुर्च्यांमध्ये 5 ते 6 फूटांचे अंतर राखले जाणार असून पटांगणाच्या सहा प्रवेशद्वारांवर सॅनिटायझरची व्यवस्था राहणार आहे, अशी माहिती प्रा. अनिल सोले यांनी यावेळी दिली.
दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com