उदघाटन सोहळ्यानंतर पहिल्याच दिवशी रविवारी आझाद बगीचात नागरिकांची मोठी गर्दी
चंद्रपूर – चंद्रपूर शहराचे हृदयस्थान असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद बगीचाचे रूप पालटले असून, भव्यदिव्य, मनमोहक आणि आकर्षक असा बगीचा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शनिवार, दिनांक २६ मार्च २०२२ रोजी रात्री मोठ्या थाटात पार पडला.
उदघाटन लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. खासदार बाळू धानोरकर यांची उपस्थिती प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सभागृह नेता देवानंद वाढई, भाजपचे महानगराध्यक्ष, डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या चित्राचे अनावरण केले. त्यानंतर रिमोट दाबून एलईडीचे द्वार उघडून बगीचा त प्रवेश करण्यात आला. बागेत योगनृत्य, स्केटिंग, महाराष्ट्र संगीत, आदिवासी नृत्य, महात्मा ज्योतिबा फुले यांचे एकपात्री प्रयोग आणि विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमात बगीचा त दररोज नियमित येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मंच, योग परिवार, बगीचा मित्र परिवार आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हा सोहळा बघण्यासाठी शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आझाद बगीच्याचे शनिवारी रात्री उद्घाटन झाल्यानंतर रविवार, दिनांक 27 मार्च रोजी दिवसभर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बगिच्यात नेताजी पार्क, स्केटिंग आणि योगा, बॅडमिंटन कोर्ट, चिल्ड्रेन पार्क, ज्योतिबा फुले पार्क, पाथवे, शहीद स्मारक पार्क, फ्लावर गार्डन, गार्डनिंग आणि लॅंडस्कॅपिंग, भव्य मंदिर, आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई, भव्य पार्किंग आणि फूड कोर्ट देखील साकारण्यात आले आहे. रविवारी सकाळी पहाटे पाच वाजेपासून अनेक नागरिकांनी देण्यास सुरुवात केली. सकाळी महिला चा झुम्बा डान्स, तरुण मुले स्केटिंग आणि व्यायाम करणाऱ्या नागरिकांनी याचा आनंद घेतला. हा बगीच्या सुरू झाल्याने चंद्रपूर शहरातील महिला तरुण आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.