नागपूर : केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेला ४ वर्षे पूर्ण झाली. या योजनेचा स्थापना दिवस आरोग्यवर्धिनी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शनिवारी (ता. १६) मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘आरोग्यवर्धिनी दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कंवर, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले की, केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत या योजनेला आज ४ वर्ष पूर्ण झाले आहेत. हा दिवस आरोग्यवर्धिनी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात २९ नागरी प्राथमिक केंद्र सुरू आहेत. यात गरोदर महिला आणि नवजात बालके यांना आरोग्य सुविधा देण्यावर भर होता. मात्र आता या सर्व केंद्रांमधून दैनिक मार्गदर्शन सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एम्स आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमधील चमू सेवा देणार आहे, अशी माहिती राम जोशी यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, मनपाच्या यूपीएचसी मध्ये येणाऱ्या रुग्णांना लागणारे वैद्यकीय मार्गदर्शन दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान तज्ञ डॉक्टर करतील. तसेच रुणांची माहिती एम्स किंवा अन्य हॉस्पिटलमध्ये पाठवून रुग्णाला लागणारी योग्य माहिती, उपचार, औषधे एक ते दोन दिवसात देण्यात येईल. त्यामुळे आता एम्स सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सुविधा सुद्धा मनपाच्या यूपीएचसी केंद्रांवर मिळणार आहेत. याच केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण, चाचणी सुद्धा करण्यात येत आहे. उत्तम प्रकारे रुग्णांना सेवा देत असून मनपाचा कर्मचारी आता बहुआयामी तयार झाला असल्याचे, प्रतिपादन यावेळी राम जोशी यांनी केले. शहरातील नागरिकांनी मनपाच्या यूपीएचसी केंद्रांचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले. यावेळी ते आरोग्यवर्धिनी योजनेबाबत माहिती सांगताना म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून दुर्गम आजारांवर तज्ज्ञांशी संवाद साधून योग्य उपचार उपलब्ध करून देण्यास मदत होईल. तसेच माता व बालसंगोपन विषयीच्या सर्व सेवा उपलब्ध होणार असल्याचे डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन आरोग्य समन्वयक दीपाली नागरे यांनी केले.