10 कोटीचे तारण कर्ज वितरण
नागपूर : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समित्यामार्फत शेतमाल तारण कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. नागपूर विभागातंर्गत शेतमाल तारण कर्ज योजना राबविणाऱ्या 22 कृषी उत्पन्न बाजार समित्या असून सोयाबीन तुर व धान या शेतमाल विक्री करणारे 1 हजार 68 शेतकऱ्यांना 50 हजार 374 क्विंटल वजनाच्या मालाचे 10 कोटी 3 लाख 47 हजार 380 रुपये तारण कर्ज अदा करण्यात आले आहे.
शेतमालाला कमी भाव असतांनाच्या काळात शेतमालाला गोदाम तसेच कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या योजनेत विशेषत: सुगीच्या काळात बाजारपेठेत एकाच वेळेस एकाच प्रकारचा मोठया प्रमाणात शेतमाल शेतकरी विक्रीस आणतात तेव्हा शेतमालाचे भाव पडतात. अशा वेळी शेतकऱ्यांच्या मालाला तारण देणारी महत्वाकांक्षी अशी ही योजना आहे.
या योजनेंतर्गत तुर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना,धान, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्याघेवडा, बेदाणा, हळद, काजू बी आणि सुपारी आदीं ना लाभ दिला जातो.
शेतकरी कमी भावाच्या काळात ही उत्पादने बाजार समितीकडे तारण ठेवू शकतात. यासाठी बाजार समितीकडून मोफत गोदाम करुन दिले जाते. तसेच वार्षिक सहा टक्के इतक्या कमी व्याज दरात शेतकऱ्यास शेतमालाच्या त्यावेळी असलेल्या बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलली आधारभूत किंमत यापैकी जी कमी असेल त्यानुसार 75 टक्के रक्कमेइतके कर्ज लगेच उपलब्ध करुन दिले जाते. त्यानंतर वाढीव भावाच्या काळात शेतकरी आपला माल विकू शकतो व कर्जाची परतफेड करुन वाढीव रक्कम शेतकऱ्यांना परत मिळते. तसेच वखार पावतीवर सुध्दा तारण कर्ज दिल्या जाते.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोफत गोदाम, गरजेच्या वेळी कर्ज, साठवणूक कालावधीमध्ये शेतकमालाचा दर्जा राखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाते. तसेच कर्ज, साठवणूक कालावधीमध्ये शेतमालाचा दर्जा राखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाते. तसेच गोदामात साठवलेल्या मालाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून विमा काढल्या जाते. अशा सुविधांमुळे शेतमालास चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे.
शेतमाल तारण कर्ज योजना प्रभावीपणे राबविता यावी. यासाठी बाजार समितीकडे चांगल्या क्षमतेचे गोदामे उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासाठी बाजार समित्यांमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने राष्ट्रीय कृषी योजनेतून वैज्ञानिक साठवण सुविधांच्या दृष्टीकोनातून वैज्ञानिक पध्दतीने गोदामे उभारलेले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तारण ठेवलेल्या मालाच्या बदल्यात त्यांना दयावयाच्या कर्जासाठीचा निधीही पणन मंडळामार्फत बाजार समित्यांना वार्षिक 3 टक्के इतक्या कमी व्याजदरात उपलब्ध करुन देण्यात येतो. ही योजना बाजार समिती व शेतकरी दोघाच्याही फायद्याची आहे. त्यामुळे शेातकऱ्यांनी आपला माल कमी भावात विक्री न करता शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यस्थापक अजय कडू यांनी केले आहे.