-विनापरवानगी झाडांच्या फांद्या छाटल्या : मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी न घेता हॉस्पीटल परिसरातील वृक्षांच्या फांद्या कापणाऱ्या रामदासपेठ येथील क्रिम्स हॉस्पीटलविरोधात शनिवारी (ता.४) मनपातर्फे सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आली.
क्रिम्स हॉस्पीटल परिसरातील वृक्षांच्या फांद्या कापण्यात आल्याचे प्रकरण लक्षात येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार आणि धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांना तात्काळ सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उद्यान निरीक्षक अनंत नागमोते यांनी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली, पोलिस प्रशासनाद्वारे तक्रारीवरून एफआयआर नोंदविण्यात आली.
शनिवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. रामदासपेठ परिसरामध्ये पाहणी करत असताना त्यांना क्रिम्स हॉस्पीटलमधील झाडांची छाटणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार आणि धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांना हॉस्पीटलमध्ये भेट देऊन छाटणी करण्यात आलेले झाडे व त्यासंबंधीची परवानगी तपासण्याचे निर्देश दिले. हॉस्पिटल परिसरातील गुलमोहर, बादाम आणि कडूलिंबाच्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आलेल्या असून यासंबंधी मनपाची परवानगी घेण्यात आली नसल्याची बाब पुढे येताच त्याची माहिती आयुक्तांना देण्यात आली. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हॉस्पीटलविरोधात एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उद्यान निरीक्षकांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर नोंदविली.