कामठी शहरासह येरखेडा, रनाळा येथील नागरिक पीत आहेत विषारी पाणी

संदीप कांबळे, कामठी

-हानीकारक घटकांचे प्रमाण १५ पट अधिक
-येरखेड्यातील रविदासनगरच्या नागरिकांची भटकंती
कामठी, ता.14 : काेराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पामुळे हाेणाऱ्या वायूप्रदूषणाची कल्पना बहुतेकांना आहे. मात्र, वीज केंद्रातील राखेमुळे जलप्रदूषणाची स्थिती त्याहून भयावह झालेली आहे. दाेन्ही प्रकल्पांच्या आसपासच्या कामठी शहर, येरखेडा, रनाळा सह २१ गावांमधील घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये फ्लायॲशमधले आर्सेनिक, मर्क्युरी, फ्लाेराईडसारखे विषारी घटक माेठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्व गावांमधील नागरिक पाण्याच्या रूपात विष पित आहेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (सीएफएसडी), नागपूर, मंथन अध्ययन केंद्र, पुणे आणि असर साेशल इम्पॅक्ट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्थानिकांच्या सहभागातून केलेल्या अभ्यासात हे वास्तव समाेर आले आहे. सीएफएसडीच्या संचालक लीना बुद्धे, मंथनचे समन्वयक श्रीपाद धर्माधिकारी यांनी या अभ्यासातील माहिती समोर आली आहे. फ्लायॲशच्या नमुन्यांमध्ये पीएम-२.५ व पीएम-१० च्या कणांसह आर्सेनिक, कॅडमियम, क्राेमियम, लेड, मॅंगनीज, मर्क्युरी, काेबाल्ट आदी जड धातूंचे घटक माेठ्या प्रमाणात असतात. हेच विषारी घटक आसपासच्या परिसरातील भूपृष्ठावरील पाणी, भूजलाच्या नमुन्यातही आढळले. टीमने २५ ठिकाणी घेतलेल्या नमुन्यात माेठ्या प्रमाणात गढूळपणा, जडपणा, क्षार व विरघळलेले घनतत्व आढळून आले. यापेक्षा गंभीर म्हणजे या सर्व नमुन्यात सर्वात धाेकादायक मानले जाणारे मर्क्युरी, आर्सेनिक, लिथियम, अल्युमिनियम, सेलेनियम, आयर्न, काॅपर, निकेल, झिंक, फ्लाेराईड, ॲन्टिमाॅनी, बाेराेन, माॅलिबडेनम आदी विषारी घटकांचे प्रमाण सुरक्षित पाण्याच्या निकषाच्या १५ पट अधिक आढळून आले. यातील काही ठिकाणच्या नमुन्यात मर्क्युरी, आर्सेनिक व अल्युमिनियमचे प्रमाण माेठ्या प्रमाणात आहे. कन्हान नदी काठावरील ठिकाणी घेतलेल्या नमुन्यात अल्युमिनियम १०० पट अधिक हाेते. खैरी गावाजवळच्या नमुन्यात मर्क्युरी व फ्लाेराईडचे प्रमाण ५० पट अधिक आढळले. हे पाणी पिण्यासाठी, आंघाेळ, कपडे धुण्यासह इतर घरघुती उपयाेग, मासेमारी, सिंचन व गुरांसाठीही वापरले जाते. या गावातील नागरिक अनेक गंभीर आजारांच्या विळख्यात सापडले असून, त्यांना गंभीर धाेक्यात जगावे लागत आहे.

-वाॅटर एटीएमचे पाणीही बाधित

शुद्ध पाणी मिळावे म्हणून कामठी शहरासह प्रकल्पाजवळच्या गावांमध्ये वाॅटर एटीएम लावण्यात आले. या एटीएमच्या पाण्यातही कमी प्रमाणात असले तरी विषारी घटक आढळून आले आहे.

-कामठी शहरासह येरखेडा, रनाळा येथे येणारे पाणीही प्रदूषित

कन्हान नदीवरूनच कामठी शहरासह येरखेडा, रनाळा येथे पाणीपुरवठा हाेताे. मागील वेळी नदी पात्रात राख साचल्याने पाणीपुरवठा बाधित झाला हाेता. शहरातील पाण्याचे नमुने तपासले नसले तरी राखेतील विषारी घटकांचे प्रदूषण शहरात येणाऱ्या पाण्यातही असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहराला लागून असलेली तालुक्यातील मोठ्या ग्राम पंचायती पैकी एक असलेली येरखेडा ग्राम पंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे तीन दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना वन-वन भटकावे लागत आहे. तर रविदास नगर येथे पाण्याचा ठणठणाट असल्याने येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

Thu Apr 14 , 2022
चंद्रपूर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने महापौर राखी संजय कंचर्लावार आणि आयुक्त राजेश मोहिते यांच्या हस्ते मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मनपाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापौर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com