नागपूर : अंजनगाव सुर्जीच्या श्रीदेवनाथ पीठाचे जगद्गुरू श्रीदेवनाथ महाराज यांच्या महासमाधी द्विशताब्दी वर्षात नागपुर महानगरपालिकेकडून देवनाथ वेदपाठ शाळेजवळील चौकाला जगद्गुरू श्रीदेवनाथ महाराज चौक असे नामकरण करण्याचा सोहोळा वेद मंत्रोच्चाराच्या स्वरात मोठ्या थाटात आज संपन्न झाला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते आणि श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज, शदानी दरबारचे साई युधिष्ठिरलाल महाराज, श्रीमंत राजे डॉ मुधोजी भोसले, महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत नामफलकाचे अनावरण झाले. मिशन फॉर डेव्हप्लमेंट अँड डिव्हीनिटी ट्रस्ट आणि मनपातर्फे आयोजित चौक नामफलक अनावरण झाल्यावर वंजारी नगर मैदानावर झालेल्या कार्यक्रमात जितेंद्रनाथ महाराज यांनी श्रीनाथ पीठ परंपरेचा दैदिप्यमान इतिहास कथन केला. अनेक आक्रमणाच्या टोळधाडीत देव देश धर्मासाठी देवनाथ परंपरेच्या पिठाधिशांनी जे कार्य केले त्याचे मेरूमणी म्हणजे देवनाथ महाराज आहेत असे जितेंद्रनाथ म्हणाले. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन माध्यमातून संदेश देत देवनाथ महाराजांना मानवंदना दिली. महापौर दयाशंकर तिवारी यांनी जगद्गुरू देवनाथ महाराज चौक नामकरण मनपा सभागृहाने एकमताने करणे हा मनपाचा बहुमान आहे असे सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात देवनाथ पीठ हे वैदर्भीय अध्यात्मिक धर्मपरंपरेचा मानदंड असून भारताचा इतिहास आणि परंपरा अश्या संतपरंपरेमुळेच टिकून राहिली आहे असे म्हटले. 

आई भानूताई गडकरीसोबत देवनाथ पिठाशी मनोहरनाथ महाराज यांच्या काळापासून गडकरी परिवाराचा ऋणानुबंध आहे त्याला उजाळा दिला. विद्यमान आचार्य जितेंद्रनाथ महाराजांनी धर्मसंस्कृती सोबतच रुग्णसेवा आणि समाज प्रबोधनाचा वसा घेतला आहे त्याला तोड नाही असेही गडकरी म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवनाथ प्रतिमेचे पूजन झाले. कार्यक्रमाला रेणुका मायबाई, कांचन गडकरी, उपमहापौर मनीषा धावडे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, रांका नेते दूनेश्वर पेठे, धंतोली झोन सभापती वंदना भगत, नगरसेविका लता काडगाये, नगरसेवक विजय चुटेले, प्रशांत हरताळकर, श्रीपाद रिसालदार, संजय भेंडे, श्रीमंत जयसिंगराजे भोसले, डॉ दिलीप पेशवे, रवीजी देशपांडे, माधव विचोरे, डॉ निरंजन देशकर, गोपाळ वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ भालचंद्र हरदास यांनी केले.