पंतप्रधानांच्या हस्ते ‘जल भूषण’ या राज्यपालांच्या कार्यालय व निवासस्थान असलेल्या इमारतीचे उदघाटन
मुंबई – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना समर्पित भूमिगत दालनाचे उदघाटन करण्यात आले.
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ‘जल भूषण’ या राज्यपालांच्या कार्यालय व निवासस्थान असलेल्या इमारतीचे देखील उदघाटन करण्यात आले.
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते (विधान परिषद) प्रवीण दरेकर, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री आदिती तटकरे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी ‘क्रांती गाथा’ दालनाची पाहणी केली तसेच राजभवनातील ऐतिहासिक श्रीगुंडी देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी इतिहासकार आणि लेखक डॉ विक्रम संपत यांनी पंतप्रधानांना ‘क्रांती गाथा’ दालनाची माहिती दिली.