विमान उड्डाण क्षेत्रात विदर्भातील युवकांना नवीन संधी उपलब्ध – आदित्य ठाकरे

– वैमानिक प्रशिक्षणाचा प्रारंभ

नागपूर उड्डाण क्लबला आवश्यक सुविधा देणार

नागपूर, दि.14 : नागपुरातील उड्डाण क्लबची गौरवशाली परंपरा असून हा क्लब पुनरुज्जीवित झाल्यामुळे विदर्भातील युवकांना विमानउड्डाण प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. नागरी उड्डाण क्षेत्रात जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या विविध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असलेल्या नागपूर उड्डाण क्लबच्या हॅंगरमध्ये वैमानिक प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष प्रारंभ श्री. ठाकरे यांचे हस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत होते. यावेळी मदत व पुनर्वसन तसेच इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार कृपाल तुमाने, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त तथा नागपूर उड्डाण क्लबच्या अध्यक्ष प्राजक्ता लवंगारे-वर्मा, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर. विमला, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे आदी उपस्थित होते.

नागपूर उड्डाण क्लब हा पुनरुज्जीवित होवून प्रशिक्षणासाठी पुन्हा उपलब्ध झाला आहे. मध्य भारतातील सर्वात गौरवशाली असलेला हा क्लब भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा कार्यान्वित होत असल्याचे सांगताना आदित्य ठाकरे म्हणाले की, येथील युवकांना विमान उड्डाणाच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांच्या पंखांना हा क्लब बळ देणार असून या क्षेत्रात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या युवकांसाठी नवे दालन खुले झाले आहे आणि युवक सुद्धा भरारी घेण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, नागपूर उड्डाण क्लबची स्थापना 1947 मध्ये झाली असून या क्लबने भारताला व जगाला अनेक वैमानिक दिले आहेत. मध्यंतरी उड्डाण क्लब बंद झाल्यामुळे शासनाने स्वतःच्या नियंत्रणाखाली आणून परत सुरु करण्याचा प्रयत्न केला. आज या क्लबच्या प्रत्यक्ष उड्डाणाला सुरुवात होत आहे. नागपूर उड्डाण क्लब येथे प्रशिक्षणार्थीसाठी पायाभूत सुविधा तसेच मध्य भारतातील सुसज्ज अशी प्रशिक्षण संस्था निर्माण व्हावी, यादृष्टीने शासनाने 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील युवकांना वैमानिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाज्योतीकडून 20 विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून या क्लबला अडीच कोटी रुपये निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. चंद्रपूर येथे सुद्धा उड्डाण क्लब सुरु करण्यासाठी डीजीसीएची परवानगी घेण्यात येत असून येथे व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणाला सुद्धा सुरुवात होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वैमानिक प्रशिक्षणाचा प्रारंभ केला. तसेच येथे बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले. नागपूर उड्डाण क्लबच्या अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी स्वागत करून नागपूर उड्डाण क्लब वैमानिक प्रशिक्षणासाठी सज्ज असून क्लबकडे प्रशिक्षणासाठी चार विमाने आहेत. या क्लबने आतापर्यंत देशाला बरेच वैमानिक दिले आहेत. उड्डाण क्षेत्रातील करिअरच्या संधी तसेच युवकांची या क्षेत्रातील आवड लक्षात घेता, वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. या क्लबमध्ये आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे प्रशिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएडीसीने 5.97 एकर जागा नवीन हँगर बांधकामासाठी उपलब्ध करून दिली असून यामध्ये मल्टीइंजिन विमान, दोन सी-प्लेन, हेलिकॉप्टर आणि सिम्युलेटर ठेवण्याचा देखील प्रस्ताव आहे. यासाठी 20 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आभार प्रदर्शन व संचालन सहायक आयुक्त मनोहर पोटे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

‘दिलखुलास’ कार्यक्रमात नागपूरच्या जिल्हाधिकारी आर.विमला यांची मुलाखत

Mon Feb 14 , 2022
मुंबई, दि. 14  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर.विमला यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवरून मंगळवार दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीमती राखी पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.           नागपूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी सुरू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com