आशीष राऊत, खापरखेडा
खापरखेडा – चनकापुर पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत 36.91 टक्के मतदान झाले. या गणात एकूण 13482 मतदार आहेत. 4976 मतदारांनी आपले मत नोंदविले. 2744 पुरुष आणि 2232 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून प्रफुल करणायके , भाजपा पक्षाकडून दिलीप उईकें, वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून अश्विनी सरयाम आणि आरपीआई समर्थित अपक्ष राजू परतेकी हे उमेदवार होते. या पंचायत समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पन्नास टक्के पेक्षा कमी मतदान झाल्याची नोंद झाली आहे. अधिकतर मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. उष्णता अधिक असल्यानेही मतदार मतदान करण्यास मतदान केंद्रापर्यंत पोहचले नाहीत. सोमवारी सकाळी 10 वाजता या निवडणुकीचा निकाल सावनेर तहसील कार्यालयात जाहीर होणार आहे.
मतदान यादीत ग्रामपंचायत पोटा-चनकापुर वॉर्ड क्रमांक एक येथील माजी ग्रामपंचायत सदस्य फुलाबाई मानवटकर यांच्यासह त्यांच्या सर्व परिवाराचे नावचं आढळून आले नाही.
अशीच परिस्थिती चीचोली वॉर्ड क्रमांक चार येथील माजी सदस्य शेख चांद शेख सरदार यांच्यासह यांच्या पूर्ण परिवाराचे नावं नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. संजय मेश्राम यांच्या पत्नी , भाऊ , वहिनी , पुतण्या , बहीण , भाचा आणि जावई यांचेही नाव नव्हते. असा प्रकार प्रत्येक बूथ वर दिसून आला.
बूथ नंबर 262 क्रमांकाची पूर्ण यादीच सिस्टम मध्ये नसल्याने उमेदवारांनी थेट जिल्हाधिकारी यांच्या पर्यंत फोन वर आपली तक्रार सांगितली. लिखित तक्रार दिल्यावर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी विमला आर यांनी दूरध्वनी वरून दिली.