चंद्रपूर २७ ऑक्टोबर – चंद्रपूर महानगरपालिकेच्या पी एम श्री सावित्रीबाई फुले शाळेत दीपोत्सव मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेला दिवाळी सुट्ट्या लागत असल्याने प्रथम सत्रातील शेवटच्या दिवशी शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी दिवाळी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयुक्त विपीन पालीवाल व उपायुक्त मंगेश खवले यांच्या मार्गदर्शनात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा पत्र व आकाशकंदील बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली.तसेच इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी किल्ले तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व राष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने दोन्ही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
मनपा सावित्रीबाई फुले शाळेत विविध उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात येतात.या विविध उपक्रमांचा उद्देश हा असतो कि, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये सकारात्मक प्रभाव पडावा, उपक्रमातील अनुभव जीवनामध्ये कामी यावा हा उद्देश उपक्रमाचा असतो. दिवाळी या सणातील महत्वाचे दिवस पाडवा,भाऊबीज, लक्ष्मीपूजन,नरक चतुर्दशी,धनत्रयोदशी,वसुबारस असे विविध दिवसासह दिवाळी प्रतिकात्मक रूपात साजरी करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध किल्ले तयार केले. शाळेतील बागेच्या फुलांची आरास यावेळी करण्यात आली होती.विविध आकाश कंदील बनवून लटकवलेले होते. शाळेचे सर्व विद्यार्थी विविध वेशभूषेत उपस्थित होते.
याप्रसंगी शहर अभियंता विजय बोरीकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यावेळी मनपा शिक्षणाधिकारी नागेश नित,शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थीत होते.