नागपूर ६ जानेवारी: महा मेट्रोच्या रिच-२ अंतर्गत असलेल्या ऑटोमोटिव्ह चौक आणि नारी रोड मेट्रो स्टेशनच्या कामाची पाहणी आज व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी केली. शहरातील अतिशय गजबजलेल्या कामठी मार्गावर मेट्रो मार्गिका असून त्याच मार्गावर हे दोन्ही स्थानके आहेत. मेट्रोच्या या मार्गिकेवर प्रवासी सेवा लवकरच सुरु होणार आहे. या दोन्ही स्टेशनचे काम प्रगती पथावर आहे.
मेट्रो स्थानकांच्या कामाचा आढावा घेण्याकरिता आज डॉ दीक्षित यांनी पाहणी करत सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील कार्य समोर ध्येय ठेवत करण्याच्या सूचना त्यांनी मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्यात. या २ मेट्रो स्थानकाच्या पाहणी दरम्यान त्यांनी विविध सूचना देखील अधिकाऱ्यांना केल्यात. कामाची गती कायम ठेवताना सुरक्षा संबंधी बाबींचा देखील तितकाच गांभीर्याने अवलंब करा, हि सूचना देखील त्यांनी दिली.
सिताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन मार्गिकेवरील सर्वात शेवटचे व महत्वाचे मेट्रो स्थानक म्हणजे ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक आहे. ऑरेंज मार्गिकेवरील या रिच-२ अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज सह एकूण ८ स्टेशन असून यात झिरो माईल फ्रीडम पार्क, कस्तुरचंद पार्क, गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड आणि ऑटोमोटिव्ह चौक – या इतर ७ मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.
ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन: यापूर्वी सुरु झालेल्या मेट्रो स्थानकांप्रमाणेच हे स्थानक देखील उत्कृष्ट स्थापत्याचे उदाहरण असणारे आणि जागतिक दर्जाच्या सेवा आणि सोयी-सुविधांनी युक्त असणार आहे. बेसमेंटची प्रशस्त जागा, व्यावसायिकांसाठी संधी आणि पार्किंगची व्यवस्था यामुळे हे मेट्रो स्टेशन मानाचा तुरा ठरणार आहे. या स्थानकाचे एकूण क्षेत्रफळ – 4236 चौ.मी. असून लांबी – 78 मी आहे. स्थानकाला ४ बाजूने लिफ्ट, ५ एस्केलेटर आणि ७ बाजूने चढायला जिने असणार आहेत.
नारी रोड मेट्रो स्टेशन: एकूण क्षेत्रफळ – 4386 चौ.मी. असून लांबी – 78 मी आहे. रस्ता पातळी वर पम्प रूम आणि पानी साठवन्याकरिता १५० चौ. मी जागा आहे. स्थानकाला ४ बाजूने लिफ्ट, ५ एस्केलेटर आणि ७ बाजूने चढायला जिने असणार आहेत.
या दोन्ही मेट्रो स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून प्रवासी अनुकूल फीडर सेवा पुरविण्यात येणार आहे.
यावेळी पाहणी दौऱ्या दरम्यान महा मेट्रोचे संचालक (प्रकल्प) श्री महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक अँड सिस्टिम) श्री सुनील माथूर, कार्यकारी संचालक (प्रशासन) श्री अनिलकुमार कोकाटे, मुख्य प्रकल्प प्रबंधक (रिच २) श्री प्रकाश मुदलियार आणि इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.