पालकांचे उद्बोधन कार्यक्रम;प्रहार संस्थेमार्फत एनडीएचे मार्गदर्शन
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपा शाळेतील सुपर-७५ विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि भारतीय सुरक्षा क्षेत्रात जाण्यासाठी खासगी कोचिंगच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहे. मागील एक महिन्यापासून फुल मार्केट येथील नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेत या मुलांचे वर्ग घेण्यात येत आहेत. सुपर-७५ प्रकल्प यशस्वी होण्यासाठी वर्गात मुलांच्या शंभर टक्के उपस्थितीसाठी पालकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना वर्गात पाठविण्याची जबादारी पालकांनी स्वीकारावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. रविवारी (ता. १९) गांधीबाग उद्यानात सुपर-७५ विद्यार्थ्यांच्या पालकांचा उद्बोधन वर्ग घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रिकोटकर, असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष रजनीकांत बोंद्रे, महेश अंधारे, शाम सेंद्रे, मनपाचे सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, सुभाष उपासे, सहायक शिक्षक शाम गोहकर, प्रहार समाज जागृती संस्थेचे अश्विन हुमने, शिवम विश्वकर्मा तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
पुढे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी ते पुढे जाऊ शकत नाही. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आपले विद्यार्थी सुद्धा पुढे जाऊ शकतात. या अशा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना भविष्यात केवळ परिस्थितीमुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्यात अडथळे येऊ नयेत यासाठी नागपूर महानगरपालिकेने ‘सुपर-७५’चा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात मनपाच्या शाळेतील ७५ विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रासह देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज होतील. पुढेही हा उपक्रम सुरूच राहणार असून पुढील पाच वर्षात मनपाचे ३०० विद्यार्थी विविध क्षेत्रासाठी तयार केले जाणार आहेत. यासाठी केवळ पालकांच्या सहयोगाची आवश्यकता आहे. पालकांनी आपल्या मुलांना मानसिकरित्या तयार करून नियमितपणे वर्गात पाठवावे. वर्गात मुलांचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षकांशी जवळीकता निर्माण होऊन मनातील शंका, प्रश्न ते त्याच वेळी विचारू शकतील. मुलगा नियमित वर्गात जायला पाहिजे ही जबाबदारी पालकांनी स्वीकारल्यास हा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
प्रस्ताविकेत मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर म्हणाल्या, महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमातील ‘सुपर-७५’ विद्यार्थ्यांना मागील एक महिन्यापासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. परीक्षा घेऊन या मुलांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालकांचा सहभाग महत्वाचा आहे. पालकांनी आपल्या मुलांना नियमित वर्गात पाठवावे, असे आवाहन यावेळी शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षक शाम गोहकर यांनी तर आभार सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके यांनी मानले.
यशाकडे नेणारा ‘४-सी’ चा मंत्र : रजनीकांत बोंद्रे
यावेळी असोसिएशन्स ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष रजनीकांत बोंद्रे सरांनी उपस्थित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना ‘४-सी’चा मंत्र सांगितला. ते म्हणाले या मंत्राचा अवलंब केल्यास यश नक्कीच मिळेल. ४-सी म्हणजे १. Consistency Attendance (क्लासमध्ये नियमितता) २. Consistency Studies (नियमित अभ्यास) ३. Consistency in Doubt Cleaning (नियमित शंकांचे निरसन करणे) ४. Consistency Appearing Examination (नियमित परीक्षांचा सराव करणे) या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी नियमित केल्यास त्यांच्यापासून यश कुणीही हिरावून घेऊ शकत नाही असेही ते यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी आयआयटी, जेईई, नीट या परिक्षांबद्दल सखोल मार्गदर्शन करून मुलांनी नियमित वर्गात उपस्थित राहावे, असे आवाहनही केले.
एनडीए बद्दल सखोल मार्गदर्शन
नीट आणि जेईई सोबतच ‘सुपर-७५’ विद्यार्थ्यांना भारतीय सुरक्षेसाठी सुद्धा तयार केले जाणार आहे. त्यासाठी प्रहर समाज जागृती संस्थेमार्फत अश्विन हुमने यांनी एनडीए परिक्षेबद्दल प्रोजेक्टरच्या साहायाने सखोल मार्गदर्शन केले. एनडीएमध्ये जाण्यासाठी पात्रता, वयोमर्यादा, शिक्षण, शारीरिक पात्रता, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे विविध टप्पे याविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच प्रहार संस्थेचे शिवम विश्वकर्मा यांनी एनडीए मध्ये का जावे याविषयी सांगितले. यावेळी त्यांनी सेवेबद्दल पालकांच्या मनात असलेल्या शंका आणि प्रश्नांचे निरसन केले. एनडीएमध्ये मुलांना पाठविण्याचे फायदे सांगितले. ते म्हणाले, एनडीए मध्ये ऑफिसर तयार केले जातात. मुलं शारीरिक आणि मानसिकरित्या प्रबळ बनतात, कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी समर्थ असतात तसेच त्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळते. त्यामुळे पालकांनी आपल्या मनात कोणतीही शंका न ठेवता आपल्या मुलांना एनडीएमध्ये पाठविण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.