नितीन लिल्हारे, विशेष प्रतिनिधी
मोहाडी : उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मागील 15 दिवसांपासून धान खरेदी बंद असल्याने चिंताग्रस्त असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाच्या रब्बी धान खरेदीचे उद्दिष्ट पुन्हा एकदा वाढवून दिले असून या संदर्भातील आदेश 2 जुलै रोजी काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्य़ानंतर केंद्राने हा निर्णय घेतल्याने केंद्र सरकार राज्यातील सरकाऱ कोसळण्याचीच वाट बघत होती हे ही यावरुन स्पष्ट झाले आहे. तसेच यासाटी खा.सुनील मेंढे यांचे सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याचे हे फलित असून उद्यापासून पुन्हा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी सुरू होणार आहे. राज्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन करणारे जिल्हे म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. उत्पादित केलेल्या या धानाची खरेदी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले जातात. राज्य शासनाच्या अधिपत्याखाली हे केंद्र चालतात. राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून केंद्राला दिल्या जाणाऱ्या पेरणी अहवालाच्या आकडेवारी नुसार केंद्र सरकार राज्याला खरेदीचे उद्दिष्ट ठरवून देते.
राज्य शासनाच्या कृषी विभागाने केंद्राला पेरणी संदर्भातील चुकीची आकडेवारी दिली होती. सुरुवातीला राज्य शासनाने संपूर्ण राज्याचे पेरणी क्षेत्र 56408 हेक्टर पाठविले होते. त्यापैकी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील पेरणीचे क्षेत्र 40325 हेक्टर व दिल्याने केंद्राने राज्य शासनाला 15 लाख क्विंटलचे उद्दिष्ट दिले. ते पूर्ण झाल्या नंतर भंडारा गोंदियाच्या कृषी विभागाने मे महिन्यात 107128 हेक्टर लागवडीचा अहवाल पाठवला. या आधारे राज्याला 27 लाख 60 हजार क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले. दोन्ही वेळा राज्य शासनाने केंद्राला चुकीचा अहवाल दिल्याने धान खरेदीचे उद्दिष्ट कमी मिळाले. त्यामुळे धान खरेदी बंद झाली. यामुळे धान विकल्या न गेल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची होत असलेली तगमग पाहून खा.सुनील मेंढे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून उदिष्ट वाढवून घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश येत अखेर दि. 2 जुलै रोजी केंद्र शासनाने पत्र काढीत राज्याचे धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिल्याचे स्पष्ट केले. 27 लाख क्विंटल वरून आता हे उद्दिष्ट 46 लाख क्विंटल करण्यात आले आहे. त्यामुळे आता बंद पडलेली धान खरेदी उद्यापासून सुरु होणार असून शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडणार आहे. खा. सुनील मेंढे यांच्या चिवट पाठपुराव्यामुळे अखेर धान विक्रीचा मार्ग मोकळा झाला असून शेतकरी समाधनी होणार आहे.
शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी जावे : खा. सुनील मेंढे
सततच्या पाठपुराव्या नंतर अखेर केंद्र शासनाकडून धान खरेदी चे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांची अडचण दूर होणार असून ज्याचे धान विकल्या गेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी उद्यापासून केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.