-शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने प्रस्तावित प्रकल्पांचा घेतला आढावा
नागपूर, ता. ३१ : नागपूर शहराला प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या १५व्या वित्त आयोग व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेला मोठा निधी प्राप्त झालेला आहे. या निधीतून नागपूर शहरात पर्यावरणपूरक बसेस, मनपातील पदाधिकारी अधिका-यांची वाहने, पर्यावरणपूरक दहन घाट सुरू करण्यासंदर्भात कार्यवाहीला गती द्या, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोग व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत नागपूर शहराची वायू गुणवत्ता सुधारण्याकरिता शासनाकडून प्राप्त निधीतून मंजूर प्रकल्पाची सद्यस्थिती व राबविण्यात येत असलेल्या प्रस्तावित प्रकल्पांचा सोमवारी (ता.३१) महापौरांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी, सोनाली चव्हाण, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सीएसआर नीरीच्या वरिष्ठ संशोधक पद्मा राव, परिवहन विभागाचे रवींद्र पागे, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री. काटोले आदी उपस्थित होते.
शहरातील वायू प्रदूषण सुधारण्याच्या दृष्टीने विविध बाबींमध्ये शहरात प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी यांनी दिली. शहरात ईलेक्ट्रिक बसेस तसेच मनपातील पदाधिकारी, अधिका-यांचे ईलेक्ट्रिक वाहनांसाठी ७७.५२ कोटी रुपये निधी प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन व संचालन व्हावे यादृष्टीने सविस्तर चर्चा करण्यासाठी मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत मनपाला बस पुरविणा-या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत महापौर कक्षात बैठक आयोजित करण्याचे निर्देश यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
शहरात पर्यावरणपूरक दहन घाटांकरिता २.९१ कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे. या निधीचा योग्य वापर करून शहरातील दहन घाटांमधून होणारे प्रदूषण कमी करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे महापौरांनी निर्देशित केले. शहरातील मोक्षधाम, गंगाबाई, अंबाझरी, मानेवाडा, वैशालीनगर, मानकापूर या दहन घाटांवर प्रेत दहन करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अशा दहन घाटांवर प्रदूषण नियंत्रण करणारे प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देण्याचेही महापौरांनी निर्देशित केले. लाकडांवर होणा-या अंत्यविधीमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढते. शहरात सीएनजी, डिझेलवरील शवदाहिनींवर शव दहन करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे दहन घाटांवर लाकडांवर होणारे दहन व त्यातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ‘नीरी’ तयार करण्यात आलेले प्रदूषण नियंत्रण युनिट बसविण्याबाबत आवश्यक त्या चर्चा करून त्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
वायू आणि ध्वनी प्रदूषणवर नियंत्रण मिळविण्यासाठी निरीचे डॉ. लाल सिंह यांच्या नेतृत्वात रस्त्याच्या मधोमध वायू प्रदूषण कमी करणा-या झाडांची लागवड करण्यात येत आहे. शहरातील विविध मार्गांवर झालेल्या वृक्षारोपनासंदर्भात यावेळी उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी माहिती दिली. शहरातील ज्या मार्गांवर जास्त वाहतूक समस्या, जिथे जास्त गोंगाट आहे. अशा भागांमध्ये प्राधान्याने अशा झाडांची लागवड करण्यात यावी. डॉ. लाल सिंह यांच्या सूचनेनुसार शहरात विविध वृक्षांची लागवड करण्याबाबत नीरीच्या वरिष्ठ संशोधक पद्मा राव यांना दैनंदिन सूचना देत ‘नीरी’च्या समन्वयाने कार्य करण्याचे महापौरांनी निर्देशित केले.
याशिवाय मेकॅनिकल स्वीपर्स मशीनसाठी ४ कोटी रुपये प्रस्तावित असून शहरातील विविध मार्गांवर त्याची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ.गजेंद्र महल्ले यांनी दिली. अत्याधुनिक मशीनद्वारे शहरातील रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे. या मशीनची पाहणी करण्यासाठी महापौरांनी भेट देण्याचा मानस यावेळी महापौरांनी व्यक्त केला.