नागपूर : ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (ता.२) ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार वाचनालय जयताळातर्फे अभिवादन करण्यात आले.
श्रध्दांजली कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव नरेंद्र जिचकार, माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील तसेच विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.
या प्रसंगी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी यांनी वाचनालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना वाचनालयात अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधी त्यांनी आश्वासीत केले. तसेच डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या सिध्दांताप्रमाणे अपयशाला न घाबरता आपण निरंतर कार्यरत रहा, प्रचंड मेहनत करा त्यातूनच आपल्या जीवनाची समृध्दी घडेल हीच डॉ. जिचकारांना खरी श्रध्दांजली राहील, असा मंत्र आयुक्तांनी विद्यार्थ्यांना दिला.
शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी वाचनालयासंदर्भात माहिती दिली तसेच प्रफुल्ल गुडधे पाटील व नरेंद्र जिचकार यांनी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जीवनचरीत्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन भारतीय शिक्षण संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले व शेवटी त्यांनी अभारही मानले.