युवक काँग्रेसच्या निवासी शिबिरात मार्गदर्शन
नागपूर – चांगला नेता होण्यासाठी त्याला कुठल्या दिशेने जायचे आहे, याचा निश्चित मार्ग माहिती असणे गरजेचे आहे. त्या मार्गावर इतरांना सोबत घेऊन चालण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रेरक व्याख्याते डॉ. अमोल मौर्य यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने नागपूर जिल्ह्याच्या पेंच सिल्लारी येथे आयोजित “लक्ष्य २०२२” या तीन दिवसीय निवासी शिबिरात त्यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मौर्य म्हणाले, नेत्याकडे दूरदृष्टी असली पाहिजे. त्याच्या प्रत्येक कृतीतून इतरांना प्रेरणा मिळून अधिकाधिक काम करण्याची ऊर्जा मिळण्याची आवश्यकता आहे. स्वतःचे दुःख विसरून दुसऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणाराच चांगला नेता होऊ शकतो.
नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्याची गरज आहे. तुमच्यातील संवाद कौशल्य, सकारात्मकता आणि इतरांमधील गुण ओळखण्याची क्षमता तुम्हाला चांगला नेता नक्कीच बनवू शकेल, असेही मौर्य यांनी सांगितले.