संताजी सभागृहासमोरील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन
चंद्रपूर – कोणताही समाज असो वा कोणताही देश गुणवान असेल, त्यावर त्याचं योग्य मूल्यांकन होत असतं. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उत्तम व्यवस्था व्हावी या दृष्टीने डॉ. वासुदेव गाडेगोणे यांनी केलेली धडपड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेली साथ, हे त्या समाजाच्या गुणवत्तेसाठी गती देते, असे प्रतिपादन माजी वन व वित्त मंत्री तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मूल रोडच्या बाजूला असलेल्या संताजी सभागृहासमोरील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन लोकलेखा समिती अध्यक्ष तथा माजी वित्त व नियोजन मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सभागृहनेता देवानंद वाढई, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका अनुराधा हजारे, नगरसेविका वनिता डुकरे, नगरसेविका कल्पना बगुलकर, डॉ. वासुदेव गाडेगोणे, डॉ. प्रेरणा कोलते, डॉ. हजारे यांच्यासह तेली समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थित होती. 

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अशाच एका कार्यक्रमात मला जाण्याचे सौभाग्य मिळाले होते आणि तेथील समाज बांधवांनी मागणी केली विनंती केली. त्यानुसार मी संत संताजी जगनाडे महाराज यांचे डाक तिकीट काढण्यासाठी पुढाकार घेतला. हे मी माझे भाग्य समजतो. याशिवाय तेली समाज आणि संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारकासाठी देखील प्रयत्न केले. आज तेली समाजामधील तरुण मोठ्या प्रमाणात उच्च पदावर पोचले आहेत. त्यांनी समाजातील शेवटच्या घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
याप्रसंगी महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या, तेली समाजाला संतांचा आशीर्वाद लाभलेला आहे. श्री संत जगनाडे महाराजांना संत तुकाराम महाराज यांच्या ओव्या, अभंग मुखोद्गत होते, म्हणून त्यांनी ती अभंगाची गाथा पुनर्लिखित केली. अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे पट्टशिष्य श्री संत जगनाडे महाराजांच्या नावे सौंदर्यीकरण करताना आनंद होत असल्याचे भावोदगार काढले. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनी देखील आपले यथोचित मार्गदर्शन केले.