मुंबई – ज्येष्ठ संपादक व पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
दिनकर रायकर हे अभ्यासू, साक्षेपी व संयत पत्रकार व संपादक होते. पत्रकारितेच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक वृत्तपत्रांमध्ये काम करताना रायकर यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला. संपादक म्हणून वाचकांचे प्रबोधन करताना त्यांनी टोकाच्या भूमिका घेतल्या नाही. राज्यातील अनेक पत्रकारांच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या माध्यम जगतातील एका व्यासंगी पत्रकार – संपादकाला तसेच समाजाशी बांधिलकी जपणाऱ्या मनमिळावू व्यक्तीला आपण मुकलो आहो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.