भंडारा : सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल संकिर्ण प्रकरण 377/2021 मध्ये दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी देण्यात आलेल्या आदेशान्वये मा. सर्वोच्च न्यायालयाकडे जमा रू. 25,53,25,548/- (पंचवीस कोटी त्रेपन्न लाख पंचवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस) इतकी रक्कम राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या निधीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर रकमेचा विनियोग कोविड-19 मुळे एक वा दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांच्या शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी या उद्देशासाठी करण्याचे नमुद करण्यात आले आहे.
वरील उद्देशांपैकी एका बालकास एक वा अधिक कामांसाठी सहाय्य देता येईल. तथापि, त्याशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी किंवा सरसकटपणे रक्कम वितरीत करता येणार नाही. सदर अर्थसहाय्याची कमाल मर्यादा दहा हजार इतकी असेल. अर्थसहाय्य संबंधातील अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, भु-विकास बँक, क्रीडा संकुल समोर भंडारा येथे उपलब्ध असून अर्जासोबत बालकाचे जन्म प्रमाणपत्र, बालकाचे आधारकार्ड, बालकाचे मुळ बोनाफाईड प्रमाणपत्र, बालकाचे बँक पासबुक झेरॉक्स प्रत (असल्यास), अर्जदार पालकाचे आधार कार्ड, अर्जदार पालकाचे रहिवासी दाखला, अर्जदार पालकाचे बँक पासबुक झेरॉक्स प्रत, मृत्यु दाखला (बालकाची आई/वडील/दोन्ही), बालकाच्या मृत आई/वडील/दोन्ही यांचा कोविड 19 मुळे मृत्यु संदर्भात कागदपत्रे, सध्या चालु महिन्याचे इलेक्ट्रीक बील ची झेरॉक्स प्रत कागदपत्रे, शैक्षणिक साहित्याची यादी जोडणे आवश्यक असेल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळवले आहे.