‘कापूस ते कापड’ प्रक्रियेचे चक्र झाले गतिमान

धागा धागा अखंड विणू या…!

 – मॅक्स या ब्रँडचे दोन लाख टी-शर्टस् साठी आर्डर

 – 27 वस्त्रनिर्मिती उद्योगांचे क्लस्टर

– 600 महिलांना प्रशिक्षण 

नागपूर, दि. 2 : कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया होऊन ‘कापूस ते कापड’ तयार करण्याची संकल्पना ‘एक गाव एक उत्पादन’ यानुसार अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे साकारली आहे. जिल्ह्यातील कापूस प्रक्रिया करणाऱ्या उत्पादन केंद्रांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत एकत्र आणून 27 उद्योगांचे क्लस्टर तयार करण्यात आले आहे. बंगलोर येथील ‘मॅक्स’ या इंटरनॅशनल ब्रँडचे दोन लाख टी शर्ट तयार करण्याची ऑर्डर या उद्योगास मिळाली आहे.

कापूस प्रक्रिया करणाऱ्या एकल उद्योगांना जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे ‘दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला’ या उद्योग समुहाचे एकत्रिकरण करण्यात आले. आता सद्यस्थितीत शेलापूर व बोरगाव मंजू येथील युनिट्स मिळून 27 युनिट कार्यरत आहेत. सुक्ष्म व लघु उद्योग एकक विकास कार्यक्रमात  हे क्लस्टर विकसित करण्यात आले. प्रत्येकी 50 लक्ष रुपये भांडवलातून ही युनिट्स उभी राहिली आहेत.

वस्त्रोद्योगाचे धागे अखंड विणत आर्थिक समृध्दीचे वस्त्र प्रावरणे शक्य झाले असून एक गाव एक उत्पादन या संकल्पनेला पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रोत्साहन दिले आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत या 27 उद्योग एककांचे एकत्रिकरण (Cluster) ‘दि संघा टेक्सटाईल डेव्हलपमेंट असोसिएशन, अकोला’ या नावाने तयार करण्यात आले असून त्यांचे प्रत्यक्ष उत्पादन सुरु झाले आहे.

            या उपक्रमाची सुरुवात सम्यक जिनिंग चिखलगाव येथून झाली. या उद्योगाचे चालक कश्यप जगताप यांनी माहिती दिली की, कापसाचे केवळ जिनिंग प्रेसिंग न करता पुढे धागे व कापड ते थेट वस्त्र तयार करेपर्यंत  प्रक्रिया येथेच कराव्यात. यासाठी विविध उद्योजकांना एकत्र केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी त्यास चालना देऊन एकूण 30 जणांना  एकत्र आणून त्यांना टेक्सटाईल उद्योगाचे प्रशिक्षण तसेच उद्योगांना भेटी आयोजित केल्या. त्यातून 27 जणांनी यात सहभाग घेतला. हे सर्व उद्योजक हे अनुसूचित जातीतील आहेत, हे विशेष.

प्रत्येक उद्योजकास 50 लक्ष रुपये भांडवल; असे साडे तेरा कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा  उद्योग केंद्राच्या शिफारशीनुसार, युनियन बॅंकेने दिले आहे. या शिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत 10 कोटी रुपये किमतीचे अत्याधुनिक यंत्रे या युनिटला अनुदानावर मंजूर झाले आहेत. तसेच साडेपाच कोटी रुपये निधी हा या परिसरातल्या रस्ते पाणी आणि विज या पायाभुत सुविधांच्या विकासासाठी प्रस्तावित आहेत. मधल्या कोरोना काळातही मोठ्या जिकरीने ह्या उद्योजकांनी आपला उद्योग उभारण्याचे काम  सुरु ठेवले होते.दरम्यान पालकमंत्री बच्चू कडू यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली होती. त्यांच्या निर्देशानुसार, या कामाला आणखी गती आली. 

कापूस ते कापड

या उद्योगात कापसाच्या गाठी बनविणे, त्याचे धागे, धागे आवश्यकतेनुसार रंगविणे, धाग्याचे कापड बनविणे  आणि कापडाचे परिधाने बनविणे अशा सर्व प्रक्रिया केल्या जातात.  साधारण दिवसाला अडीच टन कापसाची प्रक्रिया या ठिकाणी होते. कापसाची एक गाठ ही  165 किलोची असते. एकूण उत्पादन 10 हजार परिधानांचे होते. त्यात शेलापुर येथे धाग्याचे कापड बनविणे, रंगविणे याप्रकारची युनिट्स आहेत. तर बोरगाव मंजू येथे कापसापासून धागे बनविणे व कापडापासून परिधाने बनविणे ही कामे होतात. येथे बसविण्यात आलेली सर्व यंत्रे ही अत्याधुनिक आहेत. 600 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून  सद्यस्थितीत प्रकल्पाच्या सुरुवातीच्या अवस्थेत 110 कर्मचारी तसेच कामगार काम करतात. या उद्योगात कुशल महिला कामगारांची आवश्यकता असते त्या सर्व बोरगाव व जवळच्या गावांमधील आहेत. सध्या चार महिन्यापासून उत्पादन सुरु झाले आहे.

साधारण एक किलो उच्च दर्जाच्या कापसापासून 800 ग्रॅम धागे तयार होणे अपेक्षित असते तर कापड 700 ग्रॅम, सामान्यतः 700 ग्रॅम वजनाच्या कापडापासून तीन मध्यम आकाराचे टी शर्ट तयार होऊ शकतात, असे कश्यप जगताप यांनी सांगितले. नुकतेच त्यांना बंगलोर येथील एजन्सी मार्फत दोन लाख टी शर्ट मॅक्स या इंटरनॅशनल ब्रॅंडसाठी तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. आतापर्यंत त्यांनी आपला उत्पादीत माल जसे टी शर्ट, लोअर, लेगिन्स तसेच अन्य होजिअरी उत्पादने ही स्थानिक अकोला, अमरावती येथील व्यापाऱ्यांना विकली आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

पालघर नगरपरिषद, बोईसर ग्रामपंचायतीचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये समावेश

Thu Feb 3 , 2022
मुंबई –  पालघर जिल्ह्यातील पालघर नगरपरिषद व बोईसर ग्रामपंचायतीचा मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये समावेश करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.             मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे पालघर नगरपरिषद आणि बोईसर ग्रामपंचायत क्षेत्राचा मुंबई महानगर प्रदेशातील (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये समावेश होणार आहे.  ठाणे मुख्यालय असलेल्या या प्राधिकरणात यापूर्वीच नवी मुंबई महानगरपालिका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!