चंद्रपूर – राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले आणि पौंगंडाअवस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी 2015 पासून सुरू करण्यात आला आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये एका निश्चित दिवशी जंतनाशक गोळ्या देऊन दोनदा घेण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहीम येथील अंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त नसावे. म्हणूनच जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम एप्रिल-मे 2022 मध्ये आयोजित करण्यात येत आहे.
राज्यामध्ये राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून 25 एप्रिल ते दोन मे 2022 हा सप्ताह राबविण्यात येणार आहे.
शहरातील शाळा आणि अंगणवाडीत 25 एप्रिल रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा होणार असून, 29 एप्रिल रोजी माप अप दिन होईल. यामध्ये पहिली ते पाचवी वर्गातील सहा ते दहा वर्षे वयोगटातील शिवाय सहावी ते बारावी या वर्गातील 10 ते 19 वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि क्षयरोग कमी करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या जंतनाशक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.