बाबासाहेबांच्या जयंतीदिनी दारूची दुकाने सुरू ठेवण्याच्या प्रकाराचा नोंदविला निषेध
नागपूर, ता. १४ : केवळ सत्तेसाठी महापुरुषांचे नाव घेउन पुढे त्यांना विसरुन जायचे महाविकास आघाडी सरकारने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दारूची दुकाने सुरू ठेवून महाविकास आघाडी सरकारने महापुरूषांच्या विचारांना तिलांजली देत त्यांच्या विचारांची नव्हे तर महसुलाची काळजी असल्याचे सिद्ध केले आहे, असा घणाघाती टोला भाजपा प्रदेश सचिव तथा प्रवक्ता ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी लगावला.
रामनवमी आणि आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दारू दुकाने सुरू असल्याच्या प्रकारावरून भाजपा प्रदेश सचिव तथा प्रवक्ता ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून महाविकास आघाडीला धारेवर धरले.
१० एप्रिलला रामनवमी आणि १४ एप्रिल रोजी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी महाविकास आघाडी सरकारने संपूर्ण राज्यातील दारूची दुकाने सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले. एकूणच महापुरूषांचे विचार, त्यांचे कार्य याच्याशी आणि त्यासोबत जुळून असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी सरकारला काहीही देणेघेणे नाही हे यातून सिद्ध होते. सरकारला केवळ महसुलाची काळजी आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे, त्यांच्या भावनांकडे डोळेझाक करून केवळ महसूल गोळा करण्याकडेच सरकारचा कल आहे. भारतीय संविधानातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली ते राज्य आता कल्याणकारी राहिले नसल्याची परिस्थिती महाविकास आघाडी सरकारद्वारे निर्माण केली जात आहे. सरकार सर्वसामान्यांचे राहिलेले नसून पैसा मिळविण्याचे साधन झाले आहे, असा आरोप करीत ॲड. मेश्राम यांनी संपूर्ण प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे.
यापुढे अशा कोणत्याही प्रसंगी सरकारने निदान स्वत:च्या वसुलेबाजीचा विचार बाजूला ठेवित जनभावनेचा थोडा तरी विचार करून असा असंवेदनशील निर्णय घेउ नये, याबाबत विचार करण्याची सूचना देखील त्यांनी यावेळी केली.