अन्यथा साथरोग कायद्यानुसार होणार कारवाई
सौदी अरेबिया मधुन आलेल्या प्रवाशामुळे वाढली चिंता
सामान्य रूग्णालयात संशयीत रूग्ण दाखल
प्रलंबित डोस राहीलेल्यांनी लसीकरण करून घ्यावे
भंडारा : जिल्ह्यात सौदी अरेबियामधून प्रवास करून आलेल्या संशयीत रूग्णाला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच संशयीत रूग्णाच्या निवासस्थानी प्रतिबंधीत क्षेत्र करण्यात आले आहे. जिल्हावासीयांची चिंता वाढवणारी ही बाब आहे. परदेशातून जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांनी स्वत:ची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्याचे आदेश असतांनाही संबंधीत संशयीत रूग्णाने या आदेशाचा भंग केला, ही गंभीर बाब आहे. तरी जिल्ह्यात परदेशातून प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नजीकचे तहसील कार्यालय, नगरपालीका, पोलीस विभागाला द्यावी. तसेच शेजाऱ्यांनी ही त्यांच्या आजुबाजूला कोणी परदेश प्रवास करून आल्यास प्रशासनाला कळवावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज केले .
साथरोग प्रतिबंधक कायदा जिल्ह्यात लागू असून या अंतर्गत कोविड प्रसाराला प्रोत्साहन देणारी कोणतीही कृती ही नियमभंग करणारी असून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरेल याचे भान नागरिकांनी ठेवावे. ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता जिल्हा प्रशासन सज्ज असले तरी नागरिकांनी ही दक्ष राहावे. ओमायक्रॉन यापूर्वीच्या विषाणू पेक्षा घातक असल्याचे वैद्यकीय जगताने भाकित वर्तवले आहे. म्हणून नागरिकांनी कोविड अनुरूप वर्तन करावे. वारंवार हात धुवावे, मास्कचा वापर करावा आणि शारीरिक अंतराचे पालन करावे.
विदेशातून आलेल्या नागरिकांनी तात्काळ जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सचिन चव्हान यांचा मो. क्र. 9604807698 व जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. श्रीकांत आंबेकर मो. क्र. 9158512242 यांचेशी तात्काळ संपर्क साधावा. संपर्क न केल्यास आपल्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. |
लसीकरण करा, धोका टाळा
लसीकरणाने कोविड संसर्गाचा धोका सौम्य होतो. सध्या लसीकरणासाठी सर्व आरोग्य यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. तरी देखील ज्या नागरिकांचा अद्याप पहिला व दूसरा डोस प्रलंबित आहे त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. कालपर्यत 95 टक्के लोकांनी पहिला तर 66 टक्के लोकांनी घेतला दुसरा डोज घेतला आहे. जिल्ह्यात प्रतिदिन जवळपास 120 ते 130 केंद्रावर लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी एकूण पात्र लाभार्थी 8 लक्ष 98 हजार 400 आहेत. यापैकी आतापर्यंत पहिला डोज घेणाऱ्यांची संख्या 8 लक्ष 54 हजार 770 (95 टक्के) असून दुसरा डोज 5 लक्ष 91 हजार 147 (66 टक्के) नागरिकांनी घेतला आहे.