मुंबई – आयुर्वेद हे भारताचे प्राचीनतम शास्त्र आहे. आज करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच कर्करोगावर उपचारासाठी आयुर्वेद संस्थां मोठ्या प्रमाणावर संशोधन करीत आहेत. भारताचा योग ज्याप्रमाणे जागतिक स्तरावर गेला आहे, त्याप्रमाणे आयुर्वेदाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी आयुर्वेद संस्थांनी तसेच आयुर्वेद चिकित्सकांनी संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
आयुष मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेच्या वतीने कोविड प्रतिबंधक ‘आयुरक्षा किट’ मोफत वाटप अभियानाचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी (दिनांक २२) राजभवन येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सार्वजनिक आरोग्य केंद्रीय प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे संचालक डॉ दीपक राऊत व केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषद मुंबईचे प्रभारी संचालक डॉ आर. गोविंद रेड्डी व्यासपीठावर उपस्थित होते.
आयुर्वेद वैद्यांनी स्वतःच्या शास्त्राबद्दल अभिमान व निष्ठा बाळगली पाहिजे असे सांगताना आयुर्वेद औषधे देताना त्यासोबत ऍलोपॅथीची सरमिसळ करणे योग्य नाही, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले. आपण स्वतः आयुर्वेदामुळे गंभीर आजारातून वाचलो असे सांगताना कर्करोगावरील संशोधन एकत्रितरित्या झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आगामी काळात आयुर्वेद तसेच पंचकर्म चिकित्सा अधिक पुढे गेली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आयुष मंत्रालय तसेच केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेच्या वतीने भांडुप मुंबई येथे नवीन २०० बेड्सचे रुग्णालय व संशोधन केंद्र स्थापन केले जाणार असल्याची माहिती डॉ आर गोविंद रेड्डी यांनी यावेळी दिली.
परिषदेच्या वतीने कर्करोगाच्या १००० रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून प्रत्येक रुग्णाच्या प्रकृती व चिकित्सेचे दस्तावेजीकरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुष मंत्रालयाने आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच युनानी यांसारख्या चिकित्सा पद्धतींना प्रोत्साहन दिले असून आगामी ५ ते १० वर्षात आयुर्वेद घरोघरी पोहोचेल असा विश्वास डॉ दीपक राऊत यांनी व्यक्त केला.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक रूपात २० व्यक्तींना कोविड प्रतिबंधक आयुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. डॉ मनोहर गुंडेती यांनी आभार प्रदर्शन केले.