दिव्यांग व वयोश्री योजनेसंदर्भात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष शिबिर
नागपूर, ता. ०५ : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाद्वारे एडीआयपी, दिव्यांग आणि राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहायक साधने वाटपासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. शनिवारी (ता.०५) गांधीबाग झोन येथील गांधीबाग उद्यानात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर रविवार ६ मार्च रोजीसुद्धा राहील.
शिबिराला माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी झोन सभापती श्रद्धा पाठक, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय तिवारी आणि सी आर सीचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग तसेच ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यासाठी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी दयाशंकर तिवारी यांनी योजनेबद्दल माहिती सांगितली तसेच विविध प्रकारच्या दिव्यांगांना त्यांना आवश्यक सहायक साधने देण्यात येतील, याबद्दल माहिती दिली. परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा तसेच आपल्या आजूबाजूला असलेल्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेची माहिती द्यावी, असे आवाहन यावेळी माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
शिबिरामध्ये प्रारंभी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे आवश्यक कादगपत्रे तपासून नोंदणी करण्यात आली. नोंदणीनंतर दिव्यांग व ज्येष्ठांची संपूर्ण तपासणी करून त्यांना आवश्यक साहित्यासाठी पात्र असल्यास तशी पोचपावती देण्यात आली. ज्या दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय अशा अवयवांची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी विशेष तपासणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. येथे दिव्यांगांना तपासणी करून त्यांना त्यांच्या आकारानुसार आवश्यक साहित्य प्रदान करण्याबाबत पोचपावती देण्यात आली.
दिव्यांगांसाठी आवश्यक कागदपत्रे / पात्रता
– जिल्हा प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
– मासिक उत्पन्न १५ हजार किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक.
– पूर्ण पत्ता असल्याचा दाखला/आधार कार्ड
– दोन पासपोर्ट फोटो
वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे / पात्रता
– वय ६० वर्षापेक्षा जास्त
– वार्षिक उत्पन्न १ लाख ८० पेक्षा कमी
– आधार कार्ड
– उत्पन्नाचे प्रमाणपत्र /बी.पी.एल. कार्ड
– पासपोर्ट फोटा (४)