-ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या प्रश्नावर महापौर दयाशंकर तिवारी यांचे सभागृहात निर्देश
नागपूर. प्रभाग २३ येथील अंतुजी नगर व न्यू सुरज नगर या भागांना झोपडपट्टी घोषित करण्यासंदर्भात येणारे अडथळे लक्षात घेता मनपा आयुक्तांनी स्वत: परिसरात भेट देउन पाहणी करावी व त्यानंतर आवश्यक तो निर्णय घ्यावा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये दिले.
प्रभाग २३ येथील अंतुजी नगर व न्यू सुरज नगर भागाला झोपडपट्टी घोषित करण्यासंदर्भात नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रशासनाला माहिती विचारली होती. यावर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून चर्चा केली. यावर महापौरांनी उपरोक्त निर्देश दिले.
प्रभाग २३ येथील अंतुजी नगर, गंथाळे लेआउट, खसरा क्रमांक १०७/१, मौजा भांडेवाडी व न्यू सुरज नगर, खसरा क्रमांक ११० स्लम मध्ये अंतर्भूत करण्याचा प्रस्ताव मनपाला मिळाले होते ही बाब खरी असल्याचे प्रशासनाकडून मान्य करण्यात आले. मात्र महाराष्ट्र स्लम एरियाज ॲक्ट नं. XXV III of १९७१ चा कलम ४(१) हे उल्लंघन करून ह्या दोन्ही वस्त्या स्लममध्ये अंतर्भूत करण्यासाठी प्रशासन टाळाटाळ करीत असल्यास प्रशासनाकडून फेटाळण्यात आले. या वस्त्यांना झोपडपट्टी घोषित करण्यासंदर्भात महापौरांनी बैठकीत योग्य ते निर्देश दिले असतानाही निर्देशाचे पालन न झाल्याचा आरोप ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी करीत निर्देशाचे पालन न करणा-या अधिका-यावर करावयाच्या कार्यवाहीची माहिती घेतली. या प्रश्नावर प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या उत्तरात दोन्ही वस्त्यांना झोपडपट्टीमध्ये अंतर्भूत करणे योग्य नसल्याचे सांगण्यात आले. या वस्त्यांच्या परिसरात जाउन पाहणी केल्यानंतर सक्षम प्राधिकरणाद्वारे दोन्ही वस्त्या स्लममध्ये अंतर्भूत करणे योग्य वाटत नसल्याचे नमूद करण्यात आले.
यावर सविस्तर चर्चा करून ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी संपूर्ण विषय सखोलतेने सभागृहापुढे मांडला. त्यावर महापौरांनी आयुक्तांना स्वत: परिसराची पाहणी करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले.