- नागपूर येथे 27 मार्चला ‘ऐरोमॉडेलिंग शो’
- 25 ते 30 विमानांचे आकाशातून पथ संचलन होणार
- विशेष कामगिरी करणाऱ्या एन.सी.सी. कॅडेटस् चा सत्कार
- पाच हजारावर विद्यार्थी ‘ऐरोमॉडेलिंग शो’ चा आनंद घेणार
नागपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त येत्या 27 मार्च रोजी शहरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत ‘ऐरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘ऐरोमॉडेलिंग शो’च्या आयोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्मितीला चालना मिळणार असून हा शो सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा. यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी आज दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘ऐरोमॉडेलिंग शो’च्या नियोजना संदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी आर. विमला, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार, शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर, एनसीसीचे वरिष्ठ अधिकारी कर्नल परमवीर शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात, विशेष कार्य अधिकारी विजय इंगोले यांच्यासह पोलीस व वाहतूक विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून क्रीडा व युवक सेवा विभाग व राष्ट्रीय छात्र सेनाच्या संयुक्त विद्यमाने ‘ऐरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या 25 ते 30 विमानांचे आकाशातून पथ संचलन आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना भारतीय लष्करात भरती होण्याची महत्वाकांक्षा निर्माण होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनी प्रथम क्रमांक मिळालेल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथकाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही होणार आहे.
‘ऐरोमॉडेलिंग शो’ मध्ये विविध साहसी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हॉर्स रायडींग, सांस्कृतिक कार्यक्रम, एनसीसी चे विविध अत्याधुनिक यंत्र, शस्त्रात्रांची माहितीवर्धक प्रदर्शनी तसेच ॲथलेटिक्स स्टेडीयम पॅव्हेलियन इमारतीचे लोकार्पण कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच एरोमॉडेल्स, वायुसेना, नौदलांचे अत्याधुनिक यंत्रे, शस्त्रात्रे, सेवा तसेच एन.सी.सी. आदी संदर्भात यामध्ये माहिती दिल्या जाणार आहे.
नागपूर शहरातील विविध शाळांमधून सुमारे पाच हजार विद्यार्थी तर गणमान्य व्यक्ती, मान्यवर, वरिष्ठ अधिकारी, पालक, नागरिक व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी असे सुमारे दोन हजार व्यक्ती तसेच या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी एनसीसीचे अधिकारी व छात्र या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.