- उमेदवार व प्रतिनिधींसोबत बैठक
- कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
- जिल्ह्यात 15 मतदान केंद्र
नागपूर- नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करतानाच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दैनंदिन विहित माहिती सादर करण्याच्या सूचना निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे –चवरे यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.
उमेदवारांनी खर्चाचा ताळेबंद विहित नमुन्यात नियमितपणे सादर करावा. प्रचारासाठी छपाई केली जाणारी पत्रके व प्रचारसाहित्य माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घ्यावे. मतदारांना आमिष दाखवणे, कोणतेही प्रलोभन दाखविणे, मतदारांवर दबाव आणणे आदी बाबी टाळाव्यात. तसेच मतदान केंद्रांविषयी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करुन निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विमला आर. यांनी केले.
जिल्हाधिकारी विमला आर. यांनी मतदान केंद्रांची यादी उपलब्ध करुन दिली. तसेच निवडणूक आयोगाच्या नियमावलीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सुजाता गंधे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली आणि ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, तहसीलदार राहुल सारंग, तहसीलदार नीलेश काळे, नायब तहसीलदार सोनाली वाघ यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
विधान परिषद निवडणूक अनुषगांने कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली आणि ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर उपस्थित होते.