अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत कार्यशाळेचे आयोजन
नागपूर . प्रत्येक नगरपालिकेसाठी तेथील लेखाधिकारी हा अत्यंत महत्त्वाचा अधिकारी असतो. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हितासाठी नेहमी सतर्क राहणे आवश्यक असते असे मत राज्याच्या लेखा विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक किरिट देशपांडे यांनी नगरपालिकांच्या लेखाधिकाऱ्याच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप करताना व्यक्त केले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नागपूरच्यावतीने नागपूर व अमरावती विभागातील नगरपालिकांच्या लेखाअधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 24 व 25 फेब्रुवारीला नागपुरातील हॉटेल राहूल डिलक्स येथे करण्यात आले होते. या वेळी तज्ज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंट जयंत पत्राळे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले.
आर्थिक वर्ष समाप्तीच्या वेळी नगरपालिकेच्या लेखा विभागाने करावयाच्या पूर्तता, आयकर, वस्तू व सेवा कर (GST), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, व्यवसाय कर अशा अनेक कायद्यांच्या वर्षअखेर पूर्ण करायच्या तरतुदी, केंद्रीय अर्थसंकल्पात नगरपालिकांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती देणे हा कार्यशाळेचा विषय होता.
चार्टर्ड अकाउंटंट जयंत पत्राळे यांनी सादरीकरणाद्वारे विविध सत्रांमध्ये हा संपूर्ण विषय मांडला. वेगवेगळ्या कायद्यांच्या तरतुदीनुसार आणि इतर आर्थिक बाबींना पूर्ण करण्यासाठी तारीख व महिन्या नुसार नगरपालिकाकरिता एक देय दिनांकांचे वेळापत्रक देखील सर्व लेखा अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले.
एकूण 24 नगरपालिकामधून 30 प्रशिक्षणार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
दिनांक 24 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त प्रकाश बोखड यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले.
विभागीय संचालक जयंत पाठक यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रम अधिकारी पुष्कर लाभे यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी राही बापट, मंजिरी जावडेकर, जयंत राजूरकर यांनी प्रयत्न केले.