भंडारा : अभ्यासातील सातत्य, वेळेचे योग्य नियोजन , अभ्यासक्रमाची उजळणी व मेहनत करण्याची अफाट वृत्ती विद्यार्थ्यांनी ठेवल्यास नागरी सेवा परीक्षेत नक्की यश मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज नागपूर येथे केले.
जुन्या मॉरिस कॉलेज मधील प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रसंचालक डॉ. प्रमोद लाखे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्रीय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी हमखास यशस्वी होण्यासाठी असा कोणताही मूलमंत्र नाही. मात्र उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन व सातत्य हेच गुण विद्यार्थ्यांना यश मिळवून देतात . परीक्षेच्या दिवसांमध्ये अभ्यासाची करावयाची उजळणीचे नेमके वेळापत्रक तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच अपयश आल्यास कोणत्या मुद्द्यांवर आपल्याला अपयश येत आहे त्याचा सांगोपांग अभ्यास व विश्लेषण करून विद्यार्थ्यांनी स्मार्ट पद्धतीने पुढील तयारी करावी असे, कदम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले .तसेच त्यांनी केलेल्या अभ्यासातील काही बारकावे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच स्पर्धा परीक्षा सोडून अन्य करिअर पर्याय सुद्धा डोळ्यासमोर ठेवले पाहिजे असे हि ते म्हणाले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निकिता घारपिंडे यांनी केले.