प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, निबंध व चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन
नागपूर : अग्निशमनाचे कार्य करताना प्राणाची आहुती देणाऱ्या अग्निशमन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रत्येक वर्षी देशात १४ एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे शहरातील नागरिकांमध्ये अग्निशमन विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने १४ ते २० एप्रिल २०२२ दरम्यान शहरात ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ पाळण्यात येणार आहे. या दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात अग्निशमनावर आधारित प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, व्याख्याने, निबंध व चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दरवर्षी अग्निशमन सेवा दिनाची वेगवेगळी थीम असते. यंदाची थीम ‘शिका अग्नी सुरक्षितता, वाढावा उत्पादकता” ही आहे. या सप्ताहात मनपा क्षेत्रात आगीपासून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व त्यावरील उपाययोजनांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी अग्निशमन प्रात्यक्षिक घेण्यात येणार असून इयत्ता ५ वे ९ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.