ईशान्य भारतातील युवक आणि इतर राज्यांमधील विद्यार्थ्यांशी संबंध जोडण्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत युवा संगम

– मणिपूर राज्याच्या युवक- युवतींचे नागपूरात स्वागत , केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी साधला संवाद

नागपूर :- आयआयआयटी- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूरद्वारे “एक भारत श्रेष्ठ भारत” अंतर्गत महाराष्ट्र-मणिपूर युवा संगम कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मणिपूर राज्यातील युवक – युवतीं प्रतिनीधींचे काल नागपूरच्या डॉ, बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होताच स्वागत करण्यात आले. आयआयआयटी नागपूरचे संचालक डॉ. ओ.जी. काकडे यांनी अतिथींचे स्वागत केले . यावेळी कुलसचिव कैलास डाखले, विधान परिषद सदस्य प्रविण दटके प्रामुख्याने उपस्थित होते.   भाषा, शिक्षण, संस्कृती, परंपरा आणि संगीत, पर्यटन आणि पाककृती, खेळ आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण इत्यादी क्षेत्रातील सांस्कृतिक संबंधासाठी हे प्रतिनिधी नागपूर दौ-यावर असून ‘युवा संगम हा व्यापक सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रम देशातील तरुणांना भारताची प्राचीन संस्कृती आणि नैसर्गिक विविधता अनुभवण्याची संधी देईल.एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत युवा संगम कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांना देशातील विविध राज्यांना भेटी देण्याची तसेच त्यांच्या कला संस्कृती आणि भाषा समजून घेण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. ईशान्येकडील राज्य आणि इतर राज्यामधील तरुणांना पर्यटन,परंपरा,प्रगती, औद्योगिकी आणि परस्पर संपर्क या पाच व्यापक क्षेत्रांतर्गत विविध पैलूंचा बहुआयामी अनुभव प्रदान करून देण्याचा युवा संगम उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नोडल ऑफिसर डॉ. कीर्ती दोरशेटवार यांच्या द्वारे युवा संगमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आगामी दिवसांमध्ये अनेक उपक्रमांचे नियोजन केले आहे. 

दरम्यान आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या नागपूर निवासस्थानी युवा संगम कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या मणिपूरच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी या प्रतिनिधींचे स्वागत करून आणि त्यांना इथं राहून अनुभव समृद्ध होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर दीक्षाभूमी, झिरो माईल, कोराडी मंदिर, टेकडी गणेश मंदिर यांसारख्या स्थळांना या प्रतिनिधींनी भेट दिली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com