रोजगाराच्या नवक्षितिजांना तरुणांची साद

Ø नमो महारोजगार मेळाव्यातून उघडली संधीची नवी कवाडे

नागपूर :- तरूणांचा देश म्हणून जगात भारताची ओळख आहे. तरूणांची ऊर्जा देशसेवेसाठी लागण्यासोबतच त्यांच्या हाताला काम देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘नमो महारोजगार मेळाव्या’ तून झाले. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नागपूरात आयोजित या मेळाव्यात हजारो तरूण तरूणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्योग, आस्थापना व विविध क्षेत्रातील संधीमुळे तरूणांच्या भविष्याचे योग्य नियोजनाचे काम या माध्यमातून शासनाने केले आहे. या मेळाव्यात काहींना रोजगार तर काहींना त्यासाठी प्रशिक्षण मिळाले.

नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देवून त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी शासनाने आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला. येथे तरुणाईला रोजगारासह त्यांच्या क्षेत्रातील नवसंधी आणि भविष्यकालीन रोजगाराच्या व्याप्तीबाबतही माहिती मिळाली.

नमो रोजगार मेळावा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित करण्यात आला. राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत तरुणांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली. येथे प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार देणारे, रोजगार घेणारे आणि या दोघांचा मेळ करुन देणारे आयोजक असा त्रिवेणी संगम नमो महारोजगाराच्या माध्यमातून निर्माण झाला आहे. हाऊस किपिंगपासून ते आयआयटी सेक्टरपर्यंत विविध क्षेत्रातील रोजगार येथे उमेदवारांना प्राप्त झाला आहे. मेळावा संपल्यानंतरही प्रत्येक उमेदवाराला रोजगाराची संधी मिळेपर्यंत सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

नमो रोजगार मेळाव्यामध्ये सुमारे पन्नास हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. आतापर्यंत साठ हजाराच्यावर तरुणांनी येथे नोंदणी केली आहे. या मेळाव्यासाठी विदर्भातून तरुण रोजगाराच्या संधीसाठी आले होते. तरूणांना रोजगाराच्या नवीन क्षेत्राबाबत माहिती व्हावी आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी स्वतंत्र भव्य तीन डोम या परिसरात स्थापन करण्यात आले होते. ऑनलाइन नोंदणी , बायोडाटा सादर करणे, कॉल लेटर मिळविणे ते भविष्यकाळात त्यांच्या संबंधित क्षेत्रात कोठे भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे, याबाबतही युवकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी येथे तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे डोळ्यात नवीन आशा घेवून फिरत होते. आता आपण आत्मनिर्भर होणार, हा आनंद आणि समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. खऱ्या अर्थाने नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ५० हजार बेरोजगार युवकांना शासनाने आपल्या पंखाखाली घेतले आहे.   

या मेळाव्यात आपल्या आशा आकांक्षा पूर्ण झालेल्या काजलची प्रतिक्रियाच या मेळाव्याची यशस्वीता सांगून जाते. इयत्ता आठवी पास असलेल्या काजल पुसनाके, या 31 वर्षीय महिलेला येथे हाऊसकीपिंगचे काम मिळाले. आता पैशासाठी कोणासमोर हात पसरावे लागणार नाही, हे समाधान श्रीमती काजल यांच्या चेहऱ्यावर यावेळी जाणवत होते.

रोजगार प्राप्तीतून आत्मनिर्भर होण्याची चाहुल लागण्याचे समाधान काय असते याची प्रचिती आल्याची बोलकी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी शहारे या युवतीने दिली आहे. तिच्यासारख्या असंख्य तरुण-तरुणींचा आनंद हेच या महारोजगार मेळाव्याचे यश म्हणावे लागेल. ज्ञानेश्वरी बीएच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. कला शाखेला रोजगाराच्या संधी कमी असतात, असे बरेचदा बोलल्या जाते. परंतु ज्ञानेश्वरीला नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ‘यशस्वी अकॅडमी फोर स्किल’ येथे नोकरी मिळाली आहे. आई घरकाम करते तर वडील हातमजुरीचे काम. ज्ञानेश्वरीसाठी या रोजगार मेळाव्यात मिळालेले ‘कॉल लेटर’ म्हणजे तिच्या आजवरच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे जाणवले.

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mon Dec 11 , 2023
– मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांमध्ये तब्बल १५६ कोटींपर्यंत अर्थसहाय्य वाटप Your browser does not support HTML5 video. – १९ हजार हुन अधिक रुग्णांचे वाचले प्राण मुंबई :- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे.या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com