संदीप बलविर, प्रतिनिधी
भारकस (किरमिटी) येथे जागतिक महिला दिन उत्साहात
नागपूर :- ज्याला स्त्री ‘आई’ म्हणुन कळली तो जिजाऊचा “शिवबा” झाला,ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणुन कळली तो मुक्ताईचा “ज्ञानदेव” झाला,ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणुन कळली तो राधेचा “श्याम” झाला आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा “राम” झाला कारण ज्याही पुरुषांनी इतिहासात आपले नाव अजरामर केले त्या सर्व पुरुषांना नऊ महिने उदरात सांभाळणारी ही एक स्त्री च होती.म्हणून स्त्री आहे म्हणून आपण सर्वच आहो.स्त्री म्हणजे जगाची जन्मदात्री असे उद्गार प्रसिद्ध सिने अभिनेत्री दीपाली सैय्यद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
ग्रामपंचायत भारकस किरमिटी द्वारा शनिवार दि ११ मार्च ला जागतीक महिला दिनाचे आयोजन येथील ग्रा प पटांगणात मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता आतिष उमरे तर प्रमुख अतिथी म्हणून बुटीबोरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बबलू गौतम,सभापती मुन्ना जैस्वाल, शिक्षण सभापती विनोद लोहकरे,संध्या आंबटकर,जी प सदस्य नीता वलके,प स सदस्य साक्षी गायकवाड सरपंच रोशनी उमरे,दीपा गौतम,वंदना जैस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी परिसरातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या महिलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अवयव दान करणाऱ्या दिनेश सोनवणे यांच्या पत्नीचे या प्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच कोरोणा काळात आपल्या जीवाची पर्वा न करता उत्तम कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी यांचा कोरोणा योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी पाहुण्यांच्या स्वागतात परिसरातील मुलींनी पारंपरिक लोकनृत्य सादर केले.त्यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,माता रमाई,अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात येऊन कार्यक्रमाला विधिवत सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री दीपाली सैय्यद या होत्या.संचालन प्रसिद्ध ऑंकर भाविका यांनी केले तर आभार पूनम पांडे यांनी मानले.तर या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येत महिला,पुरुष व युवा उपस्थित होते.तर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात तगडा पोलीस बंदोबस्त होता.