नागपूर :- फुले शाहू आंबेडकरांची कर्मभूमी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या नागपुरात शासन प्रशासनाकडून सर्रास महापुरुषांचा अपमान केला जात आहे, त्यांची स्मारके बांधण्याच्या घोषणा केल्या जातात परंतु अनेक वर्षापर्यंत त्यांची प्रस्तावे धुळखात पडून राहतात, उलट अंबाझरी सारखी स्मारके तोडली जातात अशा प्रकारची खंत बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त व प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्याकडे केली आहे. यावर योग्य तो निर्णय लवकर झाला नाही तर बसपा जन आंदोलन उभारेल असा इशाराही याप्रसंगी बसपा नेत्यांनी दिला.
संभाजी महाराज व चंद्रगुप्त मौर्य यांच्या जयंती दिनी महाराष्ट्र प्रदेश बसपा चे महासचिव पृथ्वीराज शेंडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी रंजना ढोरे, एड राहुल सोनटक्के, जिला महासचिव चंद्रशेखर कांबळे यांच्या नेतृत्वात बसपा नेत्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. याप्रसंगी बहुजन महापुरुषां बाबत शासन प्रशासन सावत्रपणाची भूमिका घेत असल्याचे दुःख व्यक्त केले.
आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक
1991 ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षात यशवंत स्टेडियम येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मशताब्दी स्मारक बनवीण्याचा निर्णय 31 डिसेंबर 1991 ला मनपाच्या माध्यमातून एक मताने घेण्यात आला होता. त्याला 34 वर्ष पूर्ण झाली. दरम्यान काँग्रेस भाजप व त्यांच्या मित्र पक्षांची सरकारे आली, मागणी नसलेली अनेक स्मारके बनविली, पण त्या सर्वांनी जातीयवादी दृष्टिकोनातून हेतूत: आंबेडकर स्मारकाकडे दुर्लक्ष केले.
मेडिकल चौकात छत्रपती शाहू स्मारक
बहुजनांच्या आरक्षणाचे जनक बहुजन राजे राजर्षी छत्रपती शाहू यांच्या आरक्षण शताब्दी वर्षात नागपूर महानगर पालिकेने 2003 रोजी काँग्रेसचे महापौर विकास ठाकरे असताना बसपा नगरसेवकाच्या पुढाकाराने मेडिकल चौकात छत्रपती शाहूंचा पुतळा व स्मारक बनविण्याचा ठराव पास केला. त्यासाठी जागेची निश्चिती झाली, त्याचा नकाशा तयार झाला, त्यासाठी दरवर्षी फंडाची तरतूदही करण्यात आली. परंतु त्याला 22 वर्षे झाली असून सुद्धा त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. बहुजन समाज पार्टी मागील 22 वर्षापासून मेडिकल चौकातील नियोजित शाहू स्मारकाच्या जागेवर 5 मे ला स्मृती दिवस, 26 जून ला जन्मदिवस व 26 जुलै ला आरक्षण दिवस साजरा करीत असते. यावर विना विलंब निर्णय झाला नाही तर स्वतः स्मारकाचे भूमिपूजन बसपा करेल असा इशारा बसपा नेत्यांनी दिला.
सम्राट अशोक स्तंभ व स्मारक
ग्रेट नागरोड वरील सम्राट अशोक चौकात सम्राट अशोक यांचा स्तंभ व त्यांचे स्मारक उभारण्यात यावे यासाठी मागील 15 वर्षापासून मनपाकडे निवेदने देण्यात आलेली आहेत. हल्ली या ठिकाणी महाल कडून येणारा, दिघोरी कडे जाणारा ओव्हर ब्रिज व ओव्हर सर्कल बनत आहे. या सर्कल मध्येच अशोक स्तंभ प्रस्तावित आहे.
महात्मा फुलेंचा पुतळा व स्मारक दुर्लक्षित
महात्मा फुले कॉटन मार्केट समोरील फुले दांपत्यांचे पुतळे व तो परिसर अत्यंत दुर्लक्षित असून पुतळ्याला हार टाकण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. संविधान चौकात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार टाकण्यासाठी ज्या पद्धतीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे त्या पद्धतीचे सुशोभीकरण या दोन्ही पुतळ्याला करावे. सोबतच या मेट्रो स्टेशनला कॉटन मार्केट ऐवजी महात्मा फुले मार्केट मेट्रो स्टेशन असे नाव द्यावे, अशा प्रकारची अनेक निवेदने बसपाच्या वतीने मनपाला देण्यात आलेली आहेत.
शिष्टमंडळात अभिलेश वाहाने, उमेश मेश्राम, अंकित थूल, बुद्धम राऊत, नितीन वंजारी, प्रेम पाटील, भानुदास ढोरे, धरम कीरपान, अनिल खोब्रागडे, मनोज फटिंग, शेख पठाण आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.