‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ : मनपा, ज्ञानज्योती अंध विद्यालय, प्रगल्भ सेवा संस्थांचा पुढाकार
नागपूर : मेट्रोच्या पहिल्या प्रवासाची हुरहूर लागलेली… मेट्रोचा रंग, बाहेरचे दिसणारे दृष्य शिक्षक-शिक्षिका वर्णन करताना विद्यार्थ्यांचे खुलणारे चेहरे… कविता, प्रार्थना, चित्रपटांचे गीत गाऊन ही सफर ‘सेलिब्रेट’ करणारे विशेष चिमुकले जी-20 महती सांगू लागतात तेव्हा साऱ्यांच्याच नजरा त्यांच्याकडे वळतात. हे दृष्य आहे नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि प्रगल्भ सेवा संस्थेच्या विशेष पुढाकाराने नागलवाडी येथील ज्ञान ज्योती निवासी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर मेट्रोद्वारे आयोजित ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’च्या विशेष प्रवासातील. विशेष म्हणजे, ऍक्वा मार्गिकेवर लोकमान्य नगर ते सीताबर्डी आणि परत सीताबर्डी ते लोकमान्य नगर अशी सफर करताना ज्ञानज्योती अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 20, 21 आणि 22 मार्च रोजी नागपूर शहरात होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेची माहिती विषद केली. विद्यार्थ्यांनी जी-20 शिखर परिषदेचे फलक हाती घेऊन, नागपूर जी-20 च्या सिव्हिल सोसायटी अर्थात सी-20 बैठकीसाठी पूर्णतः सज्ज असल्याचे दर्शविले. यासोबतच त्यांनी स्वच्छतेबाबत जनजागृतीचेही संदेश दिले.
विशेष विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्यासमवेत नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नागपूर मेट्रोचे जनरल मॅनेजर (ऑपरेशन अँड मेंटेनन्स) सुधाकर उराडे, ज्ञानज्योती अंध विद्यालयाच्या उपाध्यक्ष रंजना जोशी, कोषाध्यक्ष पीटर अल्वारेझ, प्रशासकीय अधिकारी धीरज इंगोले, प्रगल्भ सेवा संस्थेचे अभय सबनीस, शंकर मंडवार, प्रमोद जोशी, शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम परशुरामकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ च्या या विशेष सफरीत सुमारे 100 दृष्टिबाधितांनी सहभाग नोंदविला. थेट 9.30 वाजता लोकमान्य नगर येथून ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ च्या या विशेष राईड ला सुरुवात झाली. मेट्रोमध्ये प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय…’ असा जयघोष केला. गाणी, गंमत जंमत करीत हे विद्यार्थी प्रवासातील विविध स्थळांची शिक्षक, मेट्रो कर्मचारी यांच्याकडून अनुभूती घेत होते. पहिल्या वर्गापासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या राईडचा आनंद लुटला. यापैकी बहुतेकांसाठी हा पहिलाच मेट्रो प्रवास, त्यामुळे या प्रवासाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून झळकत होता.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत सहकार्य करणाऱ्या संस्थांचे अभिनंदन केले. यापूर्वी स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूरसाठी या विद्यार्थ्यांनी रॅली काढून जनजागृतीचे कार्य केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. जी-20 शिखर परिषदेचे आयोजन ही देशासाठी अभिमानस्पद बाब असून नागपुरात या परिषदेशी संबंधित बैठक होणे ही प्रत्येक नागपूरकरांसाठी गौरवाची बाब आहे. यात या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल राम जोशी यांनी ज्ञानज्योती अंध विद्यालयाचे अभिनंदन केले.
ज्ञानज्योती अंध विद्यालयाच्या उपाध्यक्ष रंजना जोशी यांनी शाळेच्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना मेट्रोची सफर घडवून देत नवा दृष्टिकोन मिळाल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी नागपूर महानगरपालिका, नागपूर मेट्रो आणि प्रगल्भ सेवा संस्थेचे या पुढाकाराची आभार मानले.
या मेट्रो प्रवासादरम्यान शाळेचे नितीन निमजे, रोशन ठोसरे, एकनाथ पवार, संतोष हिरणवार, भैय्या सेटकुरे, आनंद कुत्तरमारे, दीपक सापेकर, प्रशांत मेंढे, संजय पंचभाई, विनोद सावरकर, चंद्रकांत निमजे, शारदा पाटील, नीरजा खोकले, निशा प्रसाद, शीतल कोटस्थाने, प्रकाश लोखंडे आदींची उपस्थिती होती.